"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 20:21 IST2025-07-14T20:14:01+5:302025-07-14T20:21:00+5:30
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मी प्रदेशाध्यक्ष असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील यांनी राजीनामा दिल्याची चर्चा असतानाच आता त्यांच्या भाजप प्रवेशावर चर्चा सुरु झाल्या आहेत. प्रदेशाध्यक्ष पदचा जयंत पाटील राजीनामा देत असल्याच्या अफवा पसलेली असताना राज्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांनी रविवारी मोठा दावा केला. जयंत पाटील त्यांच्या पक्षात स्पष्टपणे नाराज आहेत आणि ते माझ्या संपर्कात नेहमी असतात असं विधान केलं. त्यानंतर जयंत पाटील यांच्या भाजपमध्ये जाण्याची जोरदार चर्चा सुरु झाली. यावर आता जयंत पाटील यांनी स्वतःहून स्पष्टीकरण देत आपण अजूनही प्रदेशाध्यक्ष पदावर असल्याचे म्हटलं.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजीनाम्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. राजीनाम्यानंतर जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याचेही म्हटलं जात होतं. पक्ष प्रवेशासाठी जयंत पाटील आणि राज्यातल्या भाजप नेत्यांची दोनदा भेट झाली पण त्यांना मंत्रिमंडळात खातं असल्याने हा पक्षप्रवेश थांबला असल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर आता जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना याबाबत खुलासा केला.
"भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी ना मला कोणी विचारलेला आहे ना मी कोणाकडे विनंती केली आहे. एखाद्या प्रदेशाध्यक्षाबाबत एवढ्या वावड्या उठत आहेत. मी कुठल्या पक्षात जात आहे हे तुम्हीच ठरवायला लागला आहात. कोणी कोणासोबत बोललं तरी त्याची बातमी होते. एखाद्या कामासाठी दुसऱ्या कोणाला भेटलो तरी त्याची चर्चा होते. पण तशी कोणतीही परिस्थिती नाहीये. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. मी त्या पक्षाचे काम करत आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. मी त्यावर प्रतिक्रिया देत नाही कारण अशा बातम्या सारख्याच येत असतात,"
"भाजपाने माझ्याशी कधीही संपर्क साधलेला नाही. भाजपमधल्या प्रमुख नेत्यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. व्यक्तिगत वैरत्व मी कधी कोणाशी करत नाही," असंही जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना संबोधित करताना जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत अध्यक्षपद सोडण्याचे आणि नवीन चेहऱ्याला संधी देण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर शरद पवार यांनीही जयंत पाटील यांच्या भूमिकेवर सकात्मकता दाखवली होती. मात्र शनिवारी जयंत पाटील यांनी पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरु झाली. शेवटी जयंत पाटील यांनीच समोर येऊन मी प्रदेशाध्यक्षपदी अजूनही असल्याचे सांगितले.