Join us  

'डावललं नाही, मी स्वत: OBC, भाजपामध्ये सर्वाधिक आमदार ओबीसीच' 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2019 8:13 AM

एकनाथ खडसेंनी भाजपा नेतृत्वावर टीका करताना, रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडेंचा पराभव करण्यात तेच जबाबदार असल्याचं म्हटलं होतं.

मुंबई - भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वाला सतत डावलण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका प्रकाश शेंडगे, विजय वडेट्टीवार असे नेते करीत असतानाच विधानसभेच्या पराभवानंतर पक्षाचे कुठे चुकले, एवढ्या जागा कमी का झाल्या, याचे कसलेही चिंतन झालेले नाही. पराभवास जबाबदार असणाऱ्यांची नावे आम्ही दिली, पण त्याची कसली चौकशी नाही, की विचारपूस नाही, अशी टीका भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केली. एकनाथ खडसे आणि प्रकाश शेंडगेंच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना गिरीश महाजन यांनी ओबीसी नेत्यांनाच भाजपामध्ये सर्वाधिक स्थान असल्याचं म्हटलंय.   

एकनाथ खडसेंनी भाजपा नेतृत्वावर टीका करताना, रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडेंचा पराभव करण्यात तेच जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. ज्यांनी ज्यांनी या निवडणुकीत नेतृत्व म्हणून जबाबदारी घेतली होती, त्यांना या पराभवाचा जाब विचारला पाहिजे. पक्ष कधीच वाईट नसतो, लोकसभेला आम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पुण्याईमुळे मोठे यश मिळवले. काहींना आता ते यश स्वत:च्या कर्तबगारीमुळे आले, असे वाटत असेल तरी त्यांनी तसे समजण्याचे कारण नाही, असे म्हणत खडसेंनी अप्रत्यक्षपणे देवेंद्र फडणवीसांवर टीका केली होती. 

खडसेंच्या प्रश्नाला उत्तर देताना, विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पाडणाऱ्यांची नावे एकनाथराव खडसेंनी पुराव्यानिशी जाहीर करावीत, असे आव्हान माजी मंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना दिले आहे. जळगावात शुक्रवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच, ओबीसी नेत्यांना भाजपाने कधीही डावलले नाही. ओबीसी नेत्यांना मानाचे आणि सर्वाधिक स्थान दिले आहे. कोणते नेते एकत्र झाले हेच मला कळाले नाही? भारतीय जनता पक्षातील 105 आमदारांपैकी ओबीसींची संख्या मोजा, टक्केवारीनुसार सर्वात मोठी संख्या ओबीसींचीच आहे. बहुजन समाज, मराठा समाजाचेही आमदार तेवढेच आहेत. मंत्रिमंडळाचा विषय घेतला, तर ओबीसी नेत्यांचीच सर्वाधिक संख्या होती. पंकजा मुंडें, मी स्वत: ओबीसी, बावनकुळे ओबीसी, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखे आम्हा ओबीसींचीच संख्या जास्त होती, असे म्हणत ओबीसी नेत्यांना डावलण्याचा मुद्दा महाजन यांनी खोडून काढला आहे.     

दरम्यान, प्रकाश शेंडगे म्हणाले होते की, पंकजा मुंडे यांना पाडण्यात स्वकीयांचाच हात आहे. याआधी देखील गोपीनाथ मुंडे यांना पक्ष सोडून काँग्रेसमध्ये जाण्याची वेळ आणली होती. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, बहुजन समाजाच्या नेत्यांना, ओबीसी चळवळीतील नेत्यांना भाजपने कधीही स्थान दिले नाही. एकनाथ खडसे, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे यांना तिकीटे दिली गेली नाहीत. पंकजा मुंडे यांचा ज्यांनी गेम केला त्यांच्यावर त्यांनी अचूक नेम धरलेला आहे. तो कोणत्या दिशेने आहे हे येत्या 12 तारखेला कळेलच, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले होते.  

टॅग्स :गिरीश महाजनओबीसी आरक्षणभाजपाआमदारजळगाव