उत्सव मंडपात भजन, भक्तिगीत लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 05:35 AM2019-06-30T05:35:53+5:302019-06-30T05:36:01+5:30

गणेशोत्सव काळात उत्सव मंडपात चित्रपटांची गाणी लावली जातात़ भाविकांमध्ये याविषयी नाराजी आहे.

 Hymns and devotional songs will be held at the festival | उत्सव मंडपात भजन, भक्तिगीत लागणार

उत्सव मंडपात भजन, भक्तिगीत लागणार

Next

- योगेश जंगम

मुंबई : गणेशोत्सव काळात उत्सव मंडपात चित्रपटांची गाणी लावली जातात़ भाविकांमध्ये याविषयी नाराजी आहे़ उघडपणे यावर चर्चा होत नसली तरी गणेशोत्सवात भक्तिगीते, भजने लावली जावीत, असे भाविकांचे म्हणणे असते़ काही मंडळे उत्सव मंडपात भक्तिगीते, भजने लावतात़ मात्र हा नियम सर्वच मंडळांना लागू व्हावा याविषयी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश लक्ष्मण दहिबावकर यांच्याशी साधलेला संवाद.

मंडळांमार्फत गणेशोत्सव काळात मंडपात चित्रपटांची गाणी वाजविण्यात येतात. त्याबाबत काय सांगाल?
गणेशोत्सव मंडळांना मंंडपामध्ये सुगम संगीत, भजन किंवा हिंदी भजने वाजवून वातावरण निर्मिती करावी असे आवाहन करीत आहोत. अधिकाधिक मराठी भावगीतांना प्राधान्य द्या, अशा सूचना आम्ही मंडळांना यापूर्वी केलेल्या आहेत.

डीजेवर बंदी घालण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर मंडळांना काय आवाहन कराल?
डीजेमुळे कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन होत आहे. कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होत आहेत. डीजेऐवजी पारंपरिक वाद्ये वाजवा, असे निर्देश आम्ही गणेशोत्सव मंडळांना दिलेले आहेत. गेल्या वर्षीही आम्ही असे आवाहन केले होते़ त्यामुळे मंडळांनी डीजे लावला नाही़

यंदा मूर्तिकारांना किती उंचीच्या मूर्ती
बनविण्याचे आवाहन कराल? आणि का?
गणेशोत्सव हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. आपला गणेशोत्सव धार्मिकरीत्या आणि गणेशाची कुठेही विटंबना न होता करण्यासाठी गणपतीच्या मूर्तीची १८ फुटांची मर्यादा आम्ही निश्चित केली आहे. दोन ते तीन वर्षे याबाबत अंमलबजावणी योग्यरीत्या झाली; मात्र आता मंडळांमध्ये पुन्हा मूर्तीच्या उंचीची स्पर्धा वाढली आहे. मंडळांनी उंचीची मर्यादा पाळायला हवी़

मूर्तिकारांच्या उपजीविकेबाबत काही
तजवीज करण्यात आली आहे का?
२००२ साली तत्कालीन मंत्री अरुण मेहता होते. त्या वेळी आम्ही मागणी केली होती की, मूर्तिकारांची पुढची पिढी या क्षेत्रामध्ये शक्यतो येणार नाही, त्यामुळे त्यांच्या मुलांना जे.जे. आटर््स किंवा यासंदर्भातील अभ्यासक्रमांमध्ये दोन टक्के आरक्षण द्या; तसेच संबंधित विभाग
आणि मुख्यमंत्र्यांकडेही वारंवार अशी मागणी करीत आहोत़ पुलांखाली जर मूर्तिकारांना जागा दिली तर मूर्तिकारांना उपजीविकेचे साधनही होईल आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही हे चांगले असेल. महापालिकेच्या ज्या शाळा बंद आहेत ते वर्ग मूर्ती तयार करायला दिले तरीही चालेल.

रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्याबाबत काही चर्चा झाली आहे का?
आम्ही खड्डे बुजविण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून तक्रारी करीत आहोत, मात्र प्रतिसाद मिळत नाही. जर समन्वय समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला असा अनुभव येत असेल तर सर्वसामान्यांचे काय? गणपतीचे आगमन होणार आहे, म्हणून वॉर्ड लेव्हलला खड्डे बुजविले पाहिजेत. मात्र प्रतिसाद मिळत नाही. उपनगराकडे दुर्लक्ष होत आहे.

पीओपीपासून बनविण्यात येणाºया मूर्तींवर बंदी आणली तर त्यांना अनुदान मिळेल का?
शासन जनजागृतीसाठी जो खर्च जाहिरातींवर करीत आहे, तो खर्च मूर्तिकारांवर करावा. त्यांना माती उपलब्ध करून द्यावी, रंगामध्ये सवलत द्यावी आणि जागेची अडचण दूर केली तर ते शाडूच्या मूर्ती बनवतील. याची १ लाख ६० हजार घरगुती गणपतींपासून सुरुवात करावी.

एक खिडकी योजनेची मागणी होती. त्याबाबत काय सांगाल?
एक खिडकी योजना तेवढी यशस्वी झालेली नाही. आम्ही आॅनलाइनची मागणी केली होती. यावर गेल्या वर्षी आॅनलाइन परवानगीची सुविधा करण्यात आली; त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत होत्या. आता आॅफलाइन परवानगी देण्याचीही मागणी केली आहे.

डीजेऐवजी पारंपरिक वाद्ये वाजवा, असे निर्देश आम्ही गणेशोत्सव मंडळांना दिलेले आहेत.
- अ‍ॅड़ नरेश दहिबावकर

Web Title:  Hymns and devotional songs will be held at the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई