आलिंगन, भेटी, आनंदाश्रु, जल्लाेष..! दुराव्याची भिंत कोसळली आणि उद्धव-राज यांच्या कार्यकर्त्यांनी विजय उत्सवच साजरा केला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 08:19 IST2025-12-25T08:18:41+5:302025-12-25T08:19:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : उद्धवसेना आणि मनसेची युती झाल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर करताच बुधवारी वरळीतील ...

आलिंगन, भेटी, आनंदाश्रु, जल्लाेष..! दुराव्याची भिंत कोसळली आणि उद्धव-राज यांच्या कार्यकर्त्यांनी विजय उत्सवच साजरा केला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उद्धवसेना आणि मनसेची युती झाल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर करताच बुधवारी वरळीतील ब्ल्यू सी हॉटेल परिसरात जमलेल्या शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या उत्साहाला अक्षरशः भरती आली. अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या जुन्या सहकाऱ्यांचे एकमेकांना आलिंगन, एकमेकांशी हस्तांदोलन आणि अनेकांच्या डोळ्यांतून वाहणारे आनंदाश्रू असे भावनिक दृश्य होते. दुराव्याची भिंत कोसळली आणि ठाकरे ब्रँड पुन्हा एकत्र आल्याचा जल्लोष वरळीत झाला.
उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद दुपारी १२ वाजता सुरू होणार होती. त्यामुळे वेळेत ब्ल्यू सी हॉटेल गाठण्यासाठी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हॉटेलच्या परिसरात दाखल होत होते.
पत्रकार परिषदेची वेळ जसजशी जवळ येऊ लागली तसतशी कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली. हाती भगवे झेंडे, खांद्यावर भगवे उपरणे, डोक्यावर फेटे बांधून कार्यकर्ते एकमेकांना आलिंगन देत होते. पालिका जिंकण्यासाठी काय करायचे, कसे करायचे, अशी त्यांच्यात चर्चा होती.
विरार, ठाणे, नवी मुंबई येथूनही कार्यकर्ते त्यांच्या नेत्यांसोबत आले होते. त्यांच्या हातातील ‘ठाकरे ब्रँड, ठाकरे म्हणजेच महाराष्ट्र’ हे फलक लक्ष वेधून घेत होते, तर गिरगावमधील कार्यकर्त्यांचे ‘मुंबईत फक्त ठाकरे ब्रँड’ अशा मजकुराचे टी-शर्ट्सही आकर्षून घेत होते. पत्रपरिषदेचे सभागृह माध्यम प्रतिनिधी आणि आधी पोहोचलेल्या कार्यकर्त्यांनी तुडुंब होते. परिणामी, अनेक कार्यकर्ते बाहेर उभे होते.
जिंकण्याचा निर्धार
राज ठाकरे यांनी युतीची घोषणा करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. तर, सभागृहाबाहेर ढोल-ताशांनी ताल धरला. पत्रकार परिषद संपल्यावर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हॉलच्या बाहेर चहासाठी एकत्र जमले.
एकमेकांना साद देत त्यांनी एकत्र चहा घेतला. ठाकरे कुटुंब हॉटेलबाहेर पडताच कार्यकर्त्यांनीही आलिंगन देत पालिका जिंकण्याचा निर्धार करत एकमेकांचा निरोप घेतला.