‘त्या’ १२ जणांची निर्दोष सुटका कशी? मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेमागची कारणे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 09:35 IST2025-07-22T09:34:25+5:302025-07-22T09:35:07+5:30
७/११च्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ आरोपींची निर्दोष सुटका करताना उच्च न्यायालयाने दहशतवाद प्रतिबंधक पथकाच्या (एटीएस) तपासातील अनेक गंभीर त्रुटी दाखविल्या आहेत.

‘त्या’ १२ जणांची निर्दोष सुटका कशी? मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेमागची कारणे!
७/११च्या साखळी बॉम्बस्फोटातील १२ आरोपींची निर्दोष सुटका करताना उच्च न्यायालयाने दहशतवाद प्रतिबंधक पथकाच्या (एटीएस) तपासातील अनेक गंभीर त्रुटी दाखविल्या आहेत. प्रत्येक आरोपीवर केलेला आरोप वाजवी शंकेच्या पलीकडे सिद्ध करण्यात एटीएस पूर्णपणे अपयशी ठरल्याचे निरीक्षण न्यायालयाने निकालपत्रात नोंदविले आहे.
विशेष मकोका न्यायालयाचे निरीक्षण
विशेष मकोका न्यायालयाने सरकारी वकिलांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे १२ जणांना दोषी ठरविले हाेते. आरोपींचा गुन्हा ‘अत्यंत दुर्मीळ’ श्रेणीत टाकत विशेष न्यायालयाचे न्या. वाय. डी. शिंदे यांनी, गुन्ह्याचे स्वरूप सौम्य दाखवण्यासाठी आरोपींनी सादर केलेले पुरावे पुरेसे नाहीत, कारण आरोप गंभीर आहेत, असे म्हटले हाेते. त्यांनी दिलेले कबुलीजबाब आणि सरकारी वकिलांनी सादर केलेल्या पुराव्यांचा आधार घेत विशेष न्यायालयाने पाच आरोपींना फाशी, तर सात जणांना जन्मठेप सुनावली हाेती.
उच्च न्यायालयाचे निरीक्षण
आरोपींना ओळखणाऱ्या साक्षीदारांची विश्वासार्हता आणि कोणत्या प्रकारची स्फोटके वापरली गेली, हे सिद्ध करण्यात सरकारी वकिलांना अपयश आले. आरोपींच्या कबुलीजबाबाच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह. मकाेका याप्रकरणात लागू शकत नाही. कबुलीजबाबासाठी आरोपींचा छळ केल्याचा बचाव पक्षाचा दावा न्यायालयात मान्य. आरोपींची ओळख परेड घेणाऱ्या विशेष कार्यकारी अधिकाऱ्याला तसे अधिकारच नसल्याने ती ओळख परेडही कायद्याच्या दृष्टीने चुकीची ठरली.
साक्षीदारांची साक्ष अविश्वासार्ह
सरकारी वकिलांनी आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. त्यात आरोपींना चर्चगेट स्टेशनवर सोडणारे टॅक्सी चालक, आरोपींना ट्रेनमध्ये बॉम्ब ठेवताना पाहिलेले साक्षीदार, बॉम्ब जमवतानाचे आणि कटाचे साक्षीदार यांचा समावेश आहे. न्यायालयाने प्रत्येक साक्षीदाराच्या साक्षीची तपासणी केली. एका साक्षीदाराने सांगितले होते की, तो एका आरोपीच्या घरी गेला होता, तेव्हा त्याने आरोपीला बॉम्ब बनविताना पाहिले; परंतु उलटतपासणी दरम्यान, साक्षीदाराने आपण आरोपीच्या घरी गेलो नव्हतो, तर आपला मित्र आरोपीच्या घरी गेला होता आणि त्याने बॉम्ब पाहिल्याचे सांगितले.
‘साक्षीदाराने साक्ष बदलल्याने आम्ही त्याची साक्ष विचारात घेत नाही,’ असे न्यायालयाने म्हटले. कटाचा साक्षीदार असल्याचा दावा करणाऱ्या साक्षीदाराने आरोपी गुप्त बैठका घेत असल्याचे सांगितले. मात्र, बैठकीतील विषयांची त्याला माहितीच नव्हती. आरोपीचे रेखाचित्र काढण्यास मदत करणाऱ्या साक्षीदाराला साक्षीला बोलावले नाही. त्याला न्यायालयासमोर आरोपीला ओळख पटविण्यास सांगण्यात आले नसल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले.
स्फोटकांबाबतचा पुरावा
आरडीएक्स ग्रॅन्युल, डिटोनेटर, कुकर, सर्किट बोर्ड, हूक, नकाशे इत्यादींसह स्फोटकांच्या जप्तीशी संबंधित पुराव्यांबाबत हायकोर्टाने असे नमूद केले की, या पुराव्यांना महत्त्व देऊ शकत नाही. कारण सर्व पुरावे व्यवस्थितरीत्या सील करण्यात आले होते आणि त्याचा ताबा योग्य व्यक्तीकडे होता, हे सिद्ध करण्यात सरकारी वकील अपयशी ठरले आहेत. पुरावे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल)मध्ये नेईपर्यंत पुरावे सील असणे आवश्यक असते.
कबुली जबाब ‘अविश्वसनीय’
आरोपींचे कबुलीजबाब ‘अवैध’, ‘अविश्वसनीय’ आणि ‘अपूर्ण’ आहेत. कबुलीजबाब घेण्यासाठी योग्य अधिकाऱ्यांकडून पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. कबुलीजबाब घेण्यापूर्वी आणि तो घेतल्यानंतर अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या पत्रव्यवहारांमध्ये विसंगती आहे. मकोका कायद्यानुसार, कबुलीजबाब स्वेच्छेने देण्यात आल्याचे प्रमाणपत्र सादर करण्यात आले नाही, असे न्यायालयाने नमूद केले. केईएम आणि भाभा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेले वैद्यकीय पुरावेही न्यायालयाने यावेळी विचारात घेतले. ‘या वैद्यकीय नोंदी आरोपींचा छळ झाल्याची शक्यता स्पष्ट करतात. त्यावरून हा छळ कबुलीजबाब नोंदविण्यासाठी करण्यात आला होता, असे संकेत मिळतात, असे न्यायालयाने म्हटले.