How much will BJP MLA revolt against Shiv Sena? | Maharashtra Election 2019 : भाजप आमदाराची बंडखोरी शिवसेनेला कितपत भोवणार?
Maharashtra Election 2019 : भाजप आमदाराची बंडखोरी शिवसेनेला कितपत भोवणार?

मुरलीधर भवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार यांचे तिकीट कापून कल्याण पश्चिम मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला गेला.
त्यामुळे युतीचे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांच्याविरोधात भाजपच्या पवार यांनी बंडखोरी केली आहे.
परिणामी, भोईर यांच्यापुढे आव्हान उभे आहे. ते मोडून काढण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. त्यांच्यासोबत भाजपचे पदाधिकारीही प्रचारात असले, तरी पक्षाचा एक गट, मातृसंस्था असलेल्या संघ परिवाराची पवार यांना असलेली सहानुभूती हा शिवसेनेसाठी मोठा धोका आहे.


हट्टाने मागून घेतलेल्या मतदारसंघात शिवसेनेला विजय मिळाला नाही, तर आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवकांना या पराभवाची झळ पोहोचेल. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत
विजयासाठी शिवसेनेने सर्व ताकद पणाला लावली आहे. आधीच्या कामांच्या जोरावर आणि
दांडग्या जनसंपर्कावर पवार यांनी शिवसेनेचा दुसऱ्यांदा पराभव करण्याचा चंग बांधला आहे. एकंदरीतच कल्याणच्या दोन्ही मतदारसंघांतील बंडखोरी युतीच्या संबंधांवर परिणाम करणारी ठरणार आहे.


जमेच्या बाजू

शिवसेनेचे शहरप्रमुख आहेत. त्यांचे दोन भाऊ व पत्नी नगरसेवकपदी आहेत. पक्ष एकसंधपणे त्यांच्यामागे उभा आहे. संघटनात्मक संपर्क दांडगा आहे. २०१४ साली राष्ट्रवादीत असलेले गणेश कोट, संजय जाधव, मयूर पाटील हे आता शिवसेनेचे नगरसेवक आहेत. तसेच कासिफ तानकी, शकिला खान या अपक्ष नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा असल्याने हे पाठबळ ही त्यांची जमेची बाजू ठरणार आहे. भोईर मुद्देसूद भाषण करतात.

२०१४ साली शिवसेना-भाजप युती नव्हती. त्यावेळी पवार हे स्वबळावर निवडून आले होते. त्यांनी पाच वर्षांत २५० कोटींपेक्षा जास्त खर्चाची विकासकामे केली आहेत. त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. पवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले कार्यकर्ते आहेत. पक्षाची साथ नसली तरी त्यांचा चाहतावर्ग त्यांच्या पाठीशी आहे. त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांच्या पाठीशी सहानुभूती आहे, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
उणे बाजू
भोईर यांचा जनसंपर्क हा संघटनेच्या बाहेर नाही. ते सध्या लोकप्रतिनिधी नाहीत. २००० ते २००५ साली ते शिवसेना नगरसेवक होते. मात्र, २००५ ते २०१४ असा दीर्घकाळ ते लोकप्रतिनिधी नाहीत. मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर पुन्हा विश्वनाथ भोईर यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत. शिवसेना व मनसे दोघांचेही मुद्दे मराठीकेंद्री असल्याने ती मते दोन्ही उमेदवारांत विभागली जाण्याचा धोका आहे.
मतदारसंघातील आधारवाडी डम्पिंगची समस्या गेल्या पाच वर्षांत सुटू शकलेली नाही. त्याचबरोबर कल्याणच्या वाहतूककोंडीचा प्रश्न सुटलेला नाही. एनआरसी कंपनीच्या कामगारांची थकीत देणी देण्याचा विषय प्रलंबित आहे. त्यातच पक्षाचा पाठिंबा नाही. स्वपक्षातील नगरसेवकांची नाराजी त्यांच्या विरोधात होती. त्यातून उमेदवार बदलाची मागणी होती. जनतेला यातनांतून सुटका देऊ शकले नाही, हा आक्षेप ते खोडू शकलेले नाहीत.


Web Title: How much will BJP MLA revolt against Shiv Sena?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.