परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 15:44 IST2025-06-15T15:42:55+5:302025-06-15T15:44:52+5:30
Mumbai: पावसाळ्यात मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाची भूमिका महत्त्वाची असते.

परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
मुंबई: पावसाळ्यात मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाची भूमिका महत्त्वाची असते. तसाही १२ महिने २४ तास हा कक्ष कायम सज्ज असतो. पावसाळ्यात तर हा कक्ष आणखी ‘हाय अलर्ट’वर असतो. तसेच पावसाळ्यात नद्या व तलाव यातील पाण्याच्या पातळीत होणारी वाढ वेळीच लक्षात यावी, यासाठी रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवण्यात आले आहेत.
वर्षाचे ३६५ दिवस २४ तास सुरू असलेल्या पालिकेच्या आपत्कालीन कक्षात पावसाळ्याच्या अनुषंगाने योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच सर्व २४ प्रशासकीय विभागांत विभागीय नियंत्रण कक्ष मनुष्यबळासह सुसज्ज आहेत. शिवाय सर्व विभागांमध्ये गरजेनुसार अशासकीय संस्थांच्या कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. १४ आणीबाणी मदत यंत्रणांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुख्य यंत्रणांना त्यांचे नोडल अधिकारी ४.५ मीटरपेक्षा उंच लाटांची भरती असलेल्या दिवसांना मुख्य नियंत्रण कक्षात कार्यरत असणार आहेत. पाणी उपसा करण्यास ४८१ उदंचन संच बसविले आहेत. या पंपांच्या चालकांसोबत समन्वय साधता यावा, यासाठी कंत्राटदारांचे प्रतिनिधी मुख्य नियंत्रण कक्षात कार्यरत असणार आहेत.
किनाऱ्यांवर जीवरक्षक तैनात
मोठ्या भरतीच्या दिवशी कोणी समुद्रात बुडण्यासारख्या घटना घडू नयेत, याकरिता ६ समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षकांसह अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान, पोलिस पेट्रोलिंग वाहने तैनात असणार आहेत. तसेच अग्निशमन दलाच्या ६ केंद्रांवर ६ रेस्क्यू बोट्स, १२ कयाक, ४२ लाईफ जॅकेट्स, ४२ इनफ्लेटेबल जॅकेट्स, ३० रिंग बुआईज उपलब्ध आहेत. कुलाबा, वरळी, मालाड, मानखुर्द आणि घाटकोपर येथे नौदलाची पूर बचाव पथके तैनात. आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास त्वरित मदतकार्याकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकड्या अंधेरी क्रीडा संकुल येथे तैनात आहेत.
अशी आहे तयारी
- महापालिकेची २४ प्रशासकीय विभाग कार्यालये, ६ मोठी रुग्णालये व २८ बाह्य यंत्रणांना जोडणाऱ्या ५८ हॉट लाईन्स
- अतिमहत्त्वाच्या ६१ ठिकाणांसह संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांमध्ये अत्याधुनिक डिजिटल मोबाईल रेडिओ प्रणाली
- मुंबई पोलिसांमार्फत बसविण्यात आलेल्या १२,००० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे थेट प्रक्षेपण पाहण्याकरिता व्हिडीओ वॉलची सुविधा