“आम्ही अजून किती वाट पाहायची? भारतरत्न देण्यातच वीर सावरकरांचा खरा सन्मान”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:25 IST2025-05-28T12:19:51+5:302025-05-28T12:25:14+5:30

Sanjay Raut News: आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने शिफारस का केली नाही? मोदी आणि शाह यांच्या हातात असताना वीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? अशी विचारणा संजय राऊतांनी केली.

how much longer do we have to wait the real honour for veer savarkar is to be awarded the bharat ratna said sanjay raut | “आम्ही अजून किती वाट पाहायची? भारतरत्न देण्यातच वीर सावरकरांचा खरा सन्मान”: संजय राऊत

“आम्ही अजून किती वाट पाहायची? भारतरत्न देण्यातच वीर सावरकरांचा खरा सन्मान”: संजय राऊत

Sanjay Raut News: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांनी वीर सावरकरांना आदरांजली अर्पण केली. इंग्रजांनी चुकीने काढून घेतलेली सावरकरांची बॅरिस्टर पदवी मरणोत्तर परत मिळवण्यासाठी राज्य शासन इंग्लंडमधील संस्थांशी संपर्क साधणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्वागत केले. यावेळी सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करताना संजय राऊत यांनी अजून किती वाट पाहायची, असा सवाल केला आहे. 

मीडियाशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, वीर सावरकर यांची पदवी ब्रिटिशांनी जप्त केली, ती सरकार आणण्याचा प्रयत्न करत आहे, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. हा आपला ठेवा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील राहते घर सरकारने ताब्यात घेतले आणि तिथे मेमोरियल केले. त्याचेही आम्ही स्वागत केले. आता एक तलवार आणलेली आहे. त्या तलवारीवरून वाद सुरू आहे. ही तलवार खरी की खोटी? वाघनखे प्रचंड गाजावाजा करून आणली. त्या वाघनखांचे पुढे काय झाले? कुठे आहेत? कुठे फिरवली जात आहेत? निवडणुकीच्या आधी त्याची प्रदर्शने भरवली. आता वाघनखांचे काय झाले? वीर सावरकरांची जी पदवी ब्रिटिशांनी जप्त केली, ती आणण्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी एक भूमिका व्यक्त केली. त्याला कोणी विरोध करण्याचे कारण नाही. पण खरी पदवी आणा, असा खोचक टोला संजय राऊतांनी लगावला.

भारतरत्न देण्यातच वीर सावरकरांचा खरा सन्मान

वीर सावरकर हे बॅरिस्टर आहेतच, तो कागदाचा तुकडा जरी ब्रिटिशांनी जप्त केला असला तरी आम्ही त्यांना बॅरिस्टर मानतो. पण या देशाची मागणी जी आहे, ती वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची आहे. दिल्लीमध्ये पद्म पुरस्कारांचा सोहळा झाला. आम्हाला वाटत होते की, या वेळेला तरी सावरकरांना भारतरत्न दिले पाहिजे. आम्ही किती वाट पाहायची? बाकी तुम्ही पदवी आणाल, त्यांचे कपडे आणाल, त्यांची टोपी आणाल. सर्व काही आणाल. पण सावरकरांचा खरा सन्मान भारतरत्न देण्यात आहे. सावरकरांना भारतरत्न देऊन टीकाकारांची तोंडे बंद करण्यात आहे. आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने ते शिफारस का केली नाही आणि मोदी आणि शाहांनी त्यांच्या पूर्ण हातात असताना वीर सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? अशी विचारणा संजय राऊतांनी केली. 

दरम्यान, बॅरिस्टरची पदवी आणाल, समुद्रात जिथे उडी मारली तिथे तुम्ही डोके टेकाल, वर्षानुवर्ष आम्ही करत आहोत. त्यासाठी आम्हाला मोदी, शाह आणि फडणवीस यांची गरज नाही. स्वातंत्र्यवीर ही त्यांना सर्वोच्च पदवी महाराष्ट्राने दिली. वीर ही पदवी मोदी, शाह यांनी किंवा भाजपने दिलेली नाही. जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झालेला नव्हता, तेव्हा ही पदवी महाराष्ट्राने त्यांना दिली. महाराष्ट्राने वीर सावरकर यांचा सन्मान केला आणि तुम्ही राजकारण करता, अशी टीका संजय राऊतांनी केली. 

 

Web Title: how much longer do we have to wait the real honour for veer savarkar is to be awarded the bharat ratna said sanjay raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.