जागा डेव्हलपमेंट झोन कशी झाली? कांदळवनावर भरावप्रकरणी गुन्हे नोंदवण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 13:26 IST2025-07-20T13:26:10+5:302025-07-20T13:26:26+5:30
मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला बॅक रोड परिसरातील कांदळवनाची कत्तल करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी पर्यावरण मंत्री ...

जागा डेव्हलपमेंट झोन कशी झाली? कांदळवनावर भरावप्रकरणी गुन्हे नोंदवण्याचे आदेश
मुंबई :अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला बॅक रोड परिसरातील कांदळवनाची कत्तल करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पाहणी करत बेकायदा भराव टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आणि संबंधित जागेवरील भराव हटवून मूळ कांदळवनाची पुन्हा लागवड करण्याचे आदेश दिले आहेत.
विधिमंडळाच्या अधिवेशनात आ. अनिल परब यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी मुंडे घटनास्थळी पाहणीसाठी आल्या. पहाडी गोरेगाव येथे पाहणीप्रसंगी पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणे उपस्थित होते.
‘पर्यावरण रक्षणासाठी पावले उचला’
कांदळवनाची कत्तल करून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू असल्याच्या तक्रारी लक्षात घेता, अशा सर्व प्रकरणांचे संकलन करून कारवाई करावी. पर्यावरणाच्या रक्षणासाठी यंत्रणांनी जलद गतीने काम केले पाहिजे, अशा सूचना मंत्री मुंडे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
जागा डेव्हलपमेंट झोन कशी झाली?
बफर झोनमध्ये कोणतीही परवानगी न घेता भराव टाकल्याचे यावेळी पाहणीत निदर्शनास आले. प्रत्यक्ष दर्शनी नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आल्याचे सांगून ही जागा काही वर्षांपूर्वी नॉन डेव्हलपमेंट झोनमध्ये होती. ती डेव्हलपमेंट झोन कशी झाली, असा सवाल मुंडे यांनी केला. त्याचबरोबर जमीन नॉन डेव्हलपमेंट झोन असण्याची कारणे काय होती? याचा तपशीलवार शोध घेण्याचे आदेश दिले. तसेच जे कंत्राटदार बेकायदा भरावासाठी जबाबदार आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश मुंडे यांनी यावेळी दिले.