मदतीवरच भागवावा लागतो घरखर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 04:04 PM2020-04-22T16:04:41+5:302020-04-22T16:05:07+5:30

हातावर पोट असलेल्या कष्टकरी गटई कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

Housing expenses have to be met only with help | मदतीवरच भागवावा लागतो घरखर्च

मदतीवरच भागवावा लागतो घरखर्च

Next

 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात एक महिन्यापासून लॉक डाऊन चालू आहे. यामुळे हातावर पोट असलेल्या कष्टकरी गटई कामगारांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत गटई कामगार अशोक कांबळे यांनी सांगितले की, रस्त्याच्या कडेला बसून कष्टकरी गटई कामगार आपल्या व कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो. आधीच आम्हाला दिवसाला दीडशे ते दोनशे रुपये मिळत होते त्यावरच  घरखर्च चालवावा लागत होता. आधी तडजोड करत कसेबसे घरखर्च चालवत होतो. पण आता तर आणखी त्रास सहन करावा लागत आहे. सध्या देशासह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉक डाऊन पुकारण्यात आला आहे. गेल्या एक महिन्यापासून लॉक डाऊन चालू आहे. त्यामुळे कष्टकरी गटई कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. विविध संस्था संघटना मदत करत आहेत त्याच्यावर घर चालवावे लागत आहे.

याबाबत चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर म्हणाले की, गटई कामगारांची परिस्थिती बिकट आहे.शासनाने त्यांना त्वरित आर्थिक मदत देऊन आधार देण्याची गरज आहे. महाराष्ट्रात कष्टकरी गटई कामगारांना त्वरित दर महिन्याला सात हजार रुपये प्रमाणे मार्च, एप्रिल व मे तीन महिन्यासाठी मदत द्यावी, महाराष्ट्रातील विशेष करून ग्रामीण भागातील गटई कामगारांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून गटई स्टॉल सुरू करण्यास परवानगी द्यावी, कोरोना हा विषाणू जमिनीच्या पृष्ठभागावरुन पसरत असल्याने बूट, चपला मधून कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका जास्त असल्याने गटई कामगारांना कोविड १९ ची संरक्षण कीट देण्यात यावी, हा धोका ओळखून गटई कुटुंबाला २० लाखाचा आरोग्य विमा देण्यात यावा, मार्च, एप्रिल, मे असे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करण्याची मागणी चर्मकार विकास संघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना देण्यात आले आहे.  

-------------------------------

मुंबईत अन्नधान्य वाटप

गटई कामगारांची परिस्थिती आधीच बिकट आहे. त्यांना लॉकडाऊन विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रोजगार नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. मुंबईत संघटनेच्या वतीने शेकडो गटई कामगारांना अन्नधान्य वाटण्यात येत आहे, असे चर्मकार विकास संघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सुभाष मराठे निमगावकर यांनी सांगितले.

 

Web Title: Housing expenses have to be met only with help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.