पाच वर्षांत घरांच्या किमतींत ४८ टक्के वाढ, पश्चिम उपनगराला सर्वाधिक प्राधान्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 15:18 IST2024-12-31T15:17:23+5:302024-12-31T15:18:24+5:30
सिमेंट, स्टील या आणि अशा प्रमुख बांधकाम साहित्यांच्या किमतींमध्ये झालेली वाढ, भूखंडांच्या वाढलेल्या किमती, पुनर्विकासामुळे वाढलेले दर यामुळे प्रामुख्याने घरांच्या किमती वाढल्याचे विश्लेषण करण्यात आले आहे. कोरोना काळामध्ये मुंबईतच नव्हे, तर देशात अन्य उद्योगांप्रमाणे गृहनिर्माण क्षेत्रही थंडावले होते.

पाच वर्षांत घरांच्या किमतींत ४८ टक्के वाढ, पश्चिम उपनगराला सर्वाधिक प्राधान्य
मुंबई : गेल्या पाच वर्षांत मुंबईसह महामुंबई परिसरातीली घरांच्या किमतींमध्ये तब्बल ४८ टक्के वाढ झाल्याची माहिती बांधकाम क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाद्वारे पुढे आली आहे. घरांच्या किमतींमध्ये सर्वाधिक वाढ ही मुंबईच्या पश्चिम उपनगरात झाल्याचे देखील यात नमूद करण्यात आले आहे.
सिमेंट, स्टील या आणि अशा प्रमुख बांधकाम साहित्यांच्या किमतींमध्ये झालेली वाढ, भूखंडांच्या वाढलेल्या किमती, पुनर्विकासामुळे वाढलेले दर यामुळे प्रामुख्याने घरांच्या किमती वाढल्याचे विश्लेषण करण्यात आले आहे. कोरोना काळामध्ये मुंबईतच नव्हे, तर देशात अन्य उद्योगांप्रमाणे गृहनिर्माण क्षेत्रही थंडावले होते.
वर्षाकाठी दीड लाख घरांची विक्री
सरत्या तीन वर्षांत घरांची विक्रमी खरेदी होत आहे. गेल्या तीन वर्षांत सातत्याने वर्षाकाठी मुंबई शहरात दीड लाखापेक्षा जास्त घरांची विक्री होत आहे. प्रामुख्याने घराचे वाढीव आकारमान हा देखील यातील एक कळीचा मुद्दा असून, त्यामुळे देखील दरवाढ झाल्याचे दिसून आले.
आजच्या घडीला मुंबईत ज्या पायाभूत सुविधांची विकासकामे सुरू होती त्यातील अनेक कामे पूर्ण होऊन ते प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतुकीचा वेग वाढला आहे.
परिणामी, अनेक लोकांनी मुंबईत घर घेताना पश्चिम उपनगरांना प्राधान्य दिले आहे. मागणी जास्त व पुरवठा कमी यामुळे येथील घरांच्या किमतींमध्ये गेल्या पाच वर्षांत ५० टक्क्यांहून अधिक भाववाढ नोंदली गेली आहे.
घरांचे भाडेही वाढले
मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात अनेक जुन्या इमारतींचा पुनर्विकास होत आहे. ज्या इमारतींचा पुनर्विकास होत आहे त्यातील बहुतांश रहिवासी त्याच परिसरात भाड्याने राहण्यास प्राधान्य देत आहे. त्यामुळे अनेक परिसरातील भाड्यांच्या किमतीमध्ये देखील २२ टक्क्यांपर्यंत वाढ नोंदली गेली आहे.
आलिशान घरांची मागणी वाढती
मुंबईत २०२४ मध्ये झालेल्या गृहविक्रीमध्ये ३४ टक्के प्रमाण हे आलिशान घरे होते. २०२५ वर्षातही मोठ्या आणि आलिशान घरांना मागणी वाढतीच राहणार असल्याचे अहवालात नमूद आहे.