Join us

Home Minister : वाझे पे चर्चा? गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 21:55 IST

Home Minister : कोरोनामुळे सर्व पोलीस फौजफाटा रस्त्यावर, फिल्डवर आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, हे पोलिस दलाचे काम आहेच, परंतु कोरोना काळात राज्य सरकारने घातलेल्या बंधनांची अंमलबजावणी करणे हीदेखील जबाबदारी पोलिसांवर आहे.

मुंबई - गृहविभागाकडून सामान्य नागरिक व महिला यांना मोठ्या अपेक्षा असतात. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. पोलिस दलाबद्दल विश्वास वाटावा, या दृष्टिकोनातून सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करण्याचा प्रयत्न राहील, असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पदभार स्वीकारताच व्यक्त केला. त्यावेळी, लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी त्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. 

कोरोनामुळे सर्व पोलीस फौजफाटा रस्त्यावर, फिल्डवर आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे, हे पोलिस दलाचे काम आहेच, परंतु कोरोना काळात राज्य सरकारने घातलेल्या बंधनांची अंमलबजावणी करणे हीदेखील जबाबदारी पोलिसांवर आहे. याच महिन्यात गुढीपाडवा आहे, रमजान महिना सुरू होतोय. आंबेडकर जयंती, रामनवमी, महावीर जयंती हे सगळे दिवस महत्त्वाचे आहेत. तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या महिन्यात ‘चॅलेंजिंग’ परिस्थिती असणार आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले होते. तसेच, मी नुकताच पदभार स्विकारला आहे. त्यामुळे, इतर बाबींवर आत्ताच बोलणार नाही, असे म्हणत वाझेसंदर्भातील प्रश्नांना त्यांनी बगल दिली होती. 

नवीन गृहमंत्र्यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचे आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगतिले. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, यासंदर्भात माहिती नाही. मात्र, परमबीर सिंग आणि सचिन वाझे प्रकरणावर चर्चा झाल्याचा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी अद्याप मौन सोडले नाही. मात्र, योग्य वेळ येताच मुख्यमंत्रीही याबाबत बोलतील, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

बदल्या, प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप नसेल

आजी-माजी वरिष्ठ पोलिस अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांचा सल्ला घेण्याचा प्रयत्न राहील. पोलिस दलाच्या सक्षमीकरणासाठी पावले टाकू. प्रशासकीय कामात राजकीय हस्तक्षेप राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. पोलिस बदल्यांसंदर्भात विभागात पद्धती ठरलेली आहे. वेगवेगळ्या स्तरावर दिलेल्या अधिकारांनुसार निर्णय घेतले जातील. प्रशासनात हस्तक्षेप केला जाणार नाही. प्रस्तावित शक्ती कायदा, पोलिस भरती गतिमान करणे, पोलिसांसाठी घरे बांधणे या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, असेही वळसे पाटील यांनी बोलून दाखवले.  

टॅग्स :मुंबईदिलीप वळसे पाटीलमुख्यमंत्रीउद्धव ठाकरेसचिन वाझे