‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:58 IST2025-12-17T12:57:29+5:302025-12-17T12:58:03+5:30
Sanjay Raut News: निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाबाबत केलेल्या विधानांमुळे संजय राऊत अडचणीत येऊ शकतात, असे म्हटले जात आहे.

‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Sanjay Raut News: महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना-मनसे यांच्यात जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आल्या आहेत. मुंबई महत्त्वाची आहे. काल आमची सविस्तर चर्चा झाली. या चर्चेला बहुतेक आज पूर्णविराम लागेल. काल संध्याकाळी मनसे नेते आणि शिवसेनेचे नेते अंतिम हात फिरवण्यासाठी बसले होते. त्याशिवाय ठाणे, पुणे, कल्याण डोंबिवली, नाशिक इथेही चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. येत्या १-२ दिवसांत सगळे झाल्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रितपणे युतीची घोषणा होऊ शकते. काहीही झाले तरी आमच्यात विसंवाद आणि गोंधळ नाही, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाबाबत केलेली विधाने वादग्रस्त ठरत असल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोग हरामखोर असल्यामुळे पक्षांतरबंदी कायदा जो बनवला आहे, त्याची अंमलबजावणी होत नाही. भारतीय घटनेतील पक्षांतर बंदी कायद्याच्या १० व्या शेड्युलनुसार, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले ४०-४२ लोक अपात्र ठरायलाच पाहिजे. हे संविधानात असतानाही त्यांना वाचवण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाने केला, देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केला. अशा वेळेस कायदा काय करणार. कायदा यांच्या कोठीवर नाचत आहे आणि हे दौलतजादा करत आहेत, या शब्दांत संजय राऊतांनी हल्लाबोल केला. यावर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया देताना इशारा दिला.
...तर गुन्हा दाखल करू
निवडणूक आयोग ही स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे. या संस्थेवर चुकीच्या पद्धतीने कुणीही ताशेरे ओढता कामा नयेत. अशा पद्धतीचे शब्दप्रयोग करून एखाद्या स्वायत्त संस्थेचा जी आपल्या देशातील एक स्वायत्त संस्था आहे, त्या संस्थेवर अशा पद्धतीने ताशेरे ओढणे योग्य नाही. जर कुणी तक्रार केली, तर ती घेतली जाईल आणि चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिला.
दरम्यान, शिंदेसेना अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी आहे. त्यांचा नैसर्गिक जन्म नाही. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टाचे डॉक्टर यांनी एकत्र येऊन तुम्हाला जन्माला घातले आहे. तुमची व्यवस्था तात्पुरती आहे. त्यामुळे शिवतीर्थावर आम्ही सभा घेणार अशी गर्जना करू नका, अशी टीका संजय राऊतांनी केली.