संवेदनशील गृहमंत्री... चक्क ट्विटरवरुनच ई-पास मंजुरीसाठी पोलिसांना आदेश दिले
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 15:28 IST2020-06-30T15:18:59+5:302020-06-30T15:28:19+5:30
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा आता तक्रार निवारणाचे माध्यम बनला आहे. दिवंगत भाजपा नेत्या आणि तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन अनेकांच्या अडचणी दूर केल्या.

संवेदनशील गृहमंत्री... चक्क ट्विटरवरुनच ई-पास मंजुरीसाठी पोलिसांना आदेश दिले
मुंबई - राज्य सरकारने 31 जुलैपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे, अद्यापही राज्यात जिल्हाबंदी आणि राज्यांतर्गत प्रवास परवानगीशिवाय होत नाही. पोलीस प्रशासनाकडून ई-पासद्वारे परवागनी दिल्यानंतरच स्वत:च्या वाहनाने प्रवास करता येतो. त्यामुळे, नागरिकांना जिल्ह्याबाहेर प्रवासाला मोठी अडचण निर्माण होत आहे. पोलिसांकडून अत्यावश्यक आणि महत्त्वाच्या कामासाठी ई-पास देण्यात येतो. मात्र, अनेकदा ई-पासचे स्टेटस हे आठ-८ दिवस under review दिसून येते. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अशाच एका पीडित भावाने बहिणीच्या लग्नासाठी केलेल्या ई-पाससंदर्भात थेट गृहमंत्र्यांना साद घातली. अत्यावश्यक बाब ओळखून गृहमंत्र्यांनीही या भावाची विनंती मान्य करत सुखद धक्का दिला.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हा आता तक्रार निवारणाचे माध्यम बनला आहे. दिवंगत भाजपा नेत्या आणि तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरुन अनेकांच्या अडचणी दूर केल्या. विदेशात फसलेल्यांना एका ट्विटवरुन मदत मिळवून दिली. तर, लॉकडाऊन काळात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनीही ट्विटरच्या माध्यमातून लोकांच्या समस्या जाणून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. आता, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका बहिण-भावाच्या भेटीसाठी अडचण ठरणारा ई-पास मंजूर करण्याचे आदेशच पोलिसांना दिले आहेत. अहमदनगर पोलिसांना आपल्या ट्विटमध्ये मेन्शन करत गृहमंत्र्यांनी लग्नासाठी तयार असलेल्या बहिणीच्या भावाचा चक्क आनंदाचा धक्काच दिलाय.
सार्थक प्रशांत बोरा याने ट्विटरवरुन आपली कैफियत मांडली. माझ्या बहिणीचं लग्न 2 जुलै रोजी असून अद्याप माझा ई-पास मंजूर झाला नाही. गेल्या दोन दिवसांपासून ई-पासचे स्टेटस अंडर रिव्हीव येत आहे. सर, कृपया मला मदत करा, असे ट्विट करत बोरा यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अहमदनगर पोलिसांना मेन्शन केले होते. सार्थक बोरा यांच्या ट्विटची दखल घेत, गृहमंत्र्यानी ते ट्विट रिट्विट करत, अहमदनगर पोलिसांना याप्रकरणी लक्ष घालण्याचे सूचवले आहे. मात्र, त्यापुढे बोरा यांच्यासाठी एक संदेश लिहिला असून त्यातून आता सार्थक बोरा यांचा ई-पास मंजूर होईल, असे संकेतच दिले आहेत. कारण, आपण शासनाच्या निर्देशाचे पालन करुन लग्न पार पाडाल अशी आशा बाळगतो. तुमच्या बहिणीला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा आणि कुटुंबाला विवाह सोहळ्यासाठी शुभेच्छा असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलंय.
.@NagarPolice आपण सदर प्रकरणात लक्ष घालावे. @Borasarthak122 आपण शासनाच्या निर्देशांचे पालन करून लग्न पार पाडाल अशी आशा बाळगतो. तुमच्या बहिणीला उज्ज्वल भविष्यासाठी आणि कुटुंबाला विवाह सोहळ्यासाठी शुभेच्छा! https://t.co/AVvdeAiKlX
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 30, 2020