Join us

School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 12:16 IST

Mumbai School Holiday Today: हवामान विभागाने रेड अलर्ट दिल्यानंतर मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Mumbai Rain Update:मुंबई पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढल्याने मुंबई महापालिकेने दुपारच्या सत्रातील शाळांनासुट्टी जाहीर केली आहे. भारतीय हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानंतर अति मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी शाळांनासुट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हवामान विभागाकडून येत्या तीन ते चार तासांमध्ये आणखी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनावश्यक असल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आलं आहे.

भारतीय हवामान खात्याने मुंबई शहर आणि उपनगरासाठी १८ ऑगस्ट व १९ ऑगस्ट असे दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महापालिकेने दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी दिली आहे.

"भारतीय हवामान विभागाने बृहन्मुंबई क्षेत्रात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईतील दुसऱ्या सत्रातील अर्थात दुपारी १२ वाजेनंतर भरणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांना आज सुटी जाहीर केली आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शिवाय काही आवश्यकता भासल्यास मदतीसाठी व अधिकृत माहितीसाठी महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या १९१६ या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा,अशी विनंती करण्यात आली आहे," असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

मुंबईत सकाळपासून पावसाचा जोर आणखी वाढल्याने अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुंबईच्या उपनगरांसह इतर भागातही जोरदार पाऊस पडत आहे. दक्षिण मुंबईतील अनेक भागांसह कुर्ला, अंधेरी, सायन, विक्रोळी, चेंबूर, जुहू या भागांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. 

टॅग्स :मुंबईचा पाऊसमुंबईशाळासुट्टीपाऊस