Hindusthani Bhau: 'हिंदुस्थानी भाऊ'च्या अटकेविरुद्ध एकत्र या, वकिलांनी सांगितलं व्हायरल सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 15:03 IST2022-02-02T14:54:12+5:302022-02-02T15:03:20+5:30
हिंदुस्थानी भाऊच्या अटकेविरोधात बुधवारी दुपारी १२ वाजता धारावी पोलीस ठाण्याबाहेर सर्वानी एकत्र येत आंदोलन करण्याबाबतच्या पोस्ट बुधवारी सोशल मिडियावर व्हायरल झाल्या.

Hindusthani Bhau: 'हिंदुस्थानी भाऊ'च्या अटकेविरुद्ध एकत्र या, वकिलांनी सांगितलं व्हायरल सत्य
मुंबई - इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीनं घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थ्यांना चिथावून मुंबईत हजारो विद्यार्थ्यांची गर्दी केल्याप्रकरणी 'हिंदुस्थानी भाऊ' उर्फ विकास पाठक याला पोलिसांनी अटक केली आहे. सध्या तो तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे. मात्र, या हिंदुस्थानी भाऊच्या सुटकेसाठी धारावी परिसरात विद्यार्थ्यांनी एकत्र होण्यासंदर्भातील मेसेजबाबत विकास पाठकच्या वकिलांनी माहिती दिली आहे.
हिंदुस्थानी भाऊच्या अटकेविरोधात बुधवारी दुपारी १२ वाजता धारावी पोलीस ठाण्याबाहेर सर्वानी एकत्र येत आंदोलन करण्याबाबतच्या पोस्ट बुधवारी सोशल मिडियावर व्हायरल झाल्या. मात्र, हिंदुस्थानी भाऊच्या वकीलाने, आम्ही अशाप्रकारे कुठलीही पोस्ट शेअर केली नसून, कोणीही अशाप्रकारे आंदोलन करू नये असे भाऊने नमूद केल्याचे सांगितले. या पोस्टवरून विद्यार्थ्यांनी धारावी पोलीस ठाण्याकड़े येण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी सायन स्थानकापासून बंदोबस्त वाढवत येणाऱ्या विद्यार्थ्यांना माघारी पाठवले. त्यापैकी काही विद्यार्थी पोलीस ठाण्याच्या आवारात येताच त्यांना ताब्यात घेत, समजावून सोडण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं होतं?
दहावी-बारावीच्या ऑफलाइन परीक्षेविरोधात विकास फाटक ऊर्फ हिंदुस्थानी भाऊच्या सोशल मीडियावरील चिथावणीखोर वक्तव्याला प्रतिसाद देत सोमवारी मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये हजारो विद्यार्थी रस्त्यावर उरतल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दी पांगवली. धक्कादायक म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच या आंदोलनाच्या स्थळासह वेळेबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे देण्यात आली होती; मात्र याबाबत मुंबई पोलिसांसह राज्य गुप्तचर विभाग मात्र अनभिज्ञ असल्याचे दिसून आले होते.
सचिन सावंत यानी भाजपवर साधला निशाणा
सचिन सावंत यांनी ट्विट करत काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. "हिंदूस्थानी भाऊ याला सोशल मीडियावर प्रस्थापित करुन त्याला फेमस करणारी व्यावसायिक कंपनी ही भाजपा, संघाच्या संबंधित लोकांची होती. अनेक वेळा हा व्यक्ती द्वेषपूर्ण व शिवीगाळ युक्त धर्मांध वक्तव्य करीत असताना फेसबुक व इतर सोशल मीडिया त्यावर कारवाई करत नव्हते. कारण त्याला संरक्षण होते", असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.