'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 12:45 IST2025-04-22T12:43:59+5:302025-04-22T12:45:22+5:30
Maharashtra News: राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कडाडून विरोध केला आहे. त्यातूनच आता भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर रंगलं आहे, तेही शिवसेना भवनासमोर!

'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
Maharashtra Latest News: महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती नको, अशी भूमिका घेत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध सुरू केला आहे. मनसेकडून यावरून भाजपच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी महायुतीला लक्ष्य केले जात आहे. याच मुद्द्यावरून मनसेने मुंबईत आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही, असा बॅनर लावत भाजपला लक्ष्य केले. त्याला भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. भाजपनेही बॅनर लावल्यानंतर मनसेने नवीन बॅनरमधून पलटवार केला आहे. भाजप-मनसेमधील हे बॅनर वॉर रंगलं आहे, शिवसेना भवनाच्या अंगणामध्ये!
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
'आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही', असे बॅनर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत लावले आणि त्रिभाषा सूत्रांनुसार महाराष्ट्रात हिंदी सक्तीची करण्याच्या निर्णयाला विरोध केला.
'ही तर महाराष्ट्राची भक्ती'
मनसेने राज ठाकरेंच्या फोटोसह मोठे बॅनर शिवसेना भवनाबाहेर लावल्यानंतर भाजपकडून बॅनरमधून उत्तर देण्यात आले.
'ही नव्हे भाषेची सक्ती... ही तर महाराष्ट्राची भक्ती! तोडत नाही... साऱ्या देशाशी संवाद... भाषा जोडते, महाराष्ट्र देतो साद!", असे उत्तर भाजपकडून मनसेला देण्यात आले. या बॅनरवर मंदिर आणि वारकऱ्यांचाही फोटो होता.
'देशाला मराठी शिकण्याची गरज', मनसेचे उत्तर
बॅनर वॉर आणखी रंगलं जेव्हा भाजपच्या महाराष्ट्राची भक्ती बॅनर लावूनच मनसेने उत्तर दिले.
'हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे, तर सक्ती आहे. अर्धा देश महाराष्ट्रात येऊन स्वतःचं पोट भरत असेल, तर महाराष्ट्राला हिंदीची नव्हे तर देशाला मराठी भाषा शिकण्याची गरज आहे', असा पलटवार मनसेने केला आहे.
संदीप देशपांडेंची भाजपवर टीका
भाजपच्या भूमिकेवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली. ते म्हणाले, "भाजप हा सरकारमधील पक्ष आहे. त्यांचे १३२-१३६ आमदार आहेत. सरकारमध्ये असलेल्या पक्षाने किंवा लोकांनी जबाबदारी वागणं अपेक्षित आहे. बॅनरबाजी करून हा प्रश्न सुटणार आहे का?", असा सवाल संदीप देशपांडेंनी भाजपला केला.