"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 19:47 IST2026-01-01T19:46:54+5:302026-01-01T19:47:37+5:30
बाळासाहेबांनी कधीही हिंदीविरोधात वक्तव्य केले नाही. बाळासाहेब नेहमी हिंदू, हिंदुत्व यावर बोलायचे. ते कट्टर देशभक्त होते. कट्टर हिंदू होते असं निरूपम यांनी म्हटलं.

"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
मुंबई - महापालिका निवडणुकीत ठाकरे बंधू हिंदी भाषिकांविरोधात अभियान राबवून मराठी लोकांची माथी भडकवतायेत. परंतु मराठी जनतेने ठाकरे बंधूला ओळखले आहे. त्यांना त्यांची जागा दाखवली आहे. एकाचे २० आमदार तर दुसऱ्याला फक्त दीड टक्के मते आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूला मराठी माणसांनीच नाकारले आहे. गोरगरीब उत्तर भारतीयांना जर कुणी मारहाण करत असेल तर पोलिसांनी त्यांना अटक करावी, नाहीतर या लोकांमध्येही स्वाभिमान आहे. त्यांची चिंता करायला हवी असा इशाराच शिंदेसेनेचे नेते संजय निरूपम यांनी देत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिंदेसेनेचे नेते संजय निरूपम म्हणाले की, बटोगे पिटोगे याबाबत मनसे नेत्याने एक पोस्ट केली होती. त्यावर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत काळजी घ्यावी. जे कुणी मुंबईतील गोरगरिब, कष्टकरी उत्तर भारतीयांविरोधात मारहाण करण्याचं अभियान चालवतात, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करा आणि अटक करा. आम्ही एका देशात राहतो. हिंदू समाजाचे आहोत. रोजी रोटी कमावण्यासाठी इथं आले आहेत. सगळ्यांना मराठी भाषा आली पाहिजे परंतु ज्याला येत नाही ते कसे बोलू शकतात? मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परंतु २-३ महिन्यापूर्वी इथं कुणी आला आणि वॉचमेनची नोकरी करत आहे त्याला मराठीत बोल असं सांगता, तो एवढा हुशार असता तर वॉचमन बनला असता का...त्यामुळे हे जे मनसेकडून कृत्य होतायेत त्याचा मी निषेध करतो. तुम्ही सकारात्मक मानसिकतेने या निवडणुकीला सामोरे जा. लोकांकडे जा, सर्व समाजाकडे जा, तुमच्या विचारांवर मते मागा. पण लोकांच्या विरोधात समाजात फूट पाडण्याची विचारधारा आणू नका असं त्यांनी सांगितले.
तसेच कृपाशंकर सिंह महापौरपदाबाबत जे बोलले त्यावर ते स्पष्टीकरण देतील. परंतु मुंबईचा पुढचा महापौर हा मराठी भाषिक ठरवेल ही आमच्या पक्षाची भूमिका आहे. मुंबईत महायुतीची सत्ता येईल आणि महायुतीचा महापौर बनेल. मुंबईत जे लोक राहतात, ज्यांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर आहे. ज्यांच्या मनात हिंदवी स्वराज्याबद्दल आदर आहे. छत्रपतींना जे आराध्य मानतात या लोकांमधील एक, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी असेल तो मुंबईचा महापौर होईल असंही शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी म्हटलं.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदू समाजाच्या एकजुटीचा विचार आहे त्याविरोधात ठाकरे बंधू गेलेले आहेत. बाळासाहेबांनी कधीही हिंदीविरोधात वक्तव्य केले नाही. बाळासाहेब नेहमी हिंदू, हिंदुत्व यावर बोलायचे. ते कट्टर देशभक्त होते. कट्टर हिंदू होते. परंतु आता उबाठा आणि मनसेचे राजकारण आता संपले आहे. मराठी भाषिकांनी त्यांना नाकारले आहे. मराठी लोकांची माथी भडकावून ते हिंदी विरोधात अभियान चालवत आहेत ते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना ठेच पोहचवल्यासारखे आहे असं सांगत निरूपम यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली.