विशाळगडावर कुर्बानीला हायकोर्टाची परवानगी, बकरी ईदसाठी दर्गा ट्रस्टकडून याचिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 16:14 IST2025-06-04T16:13:35+5:302025-06-04T16:14:59+5:30
विशाळगड किल्ल्यावर पशुबळी देण्यास मनाई आदेश लागू करण्यात आल्याने त्याविरोधात दर्गा ट्रस्टतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती

संग्रहित छाया
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक विशाळगड किल्ल्यावरील हजरत पीर मलिक रेहान दर्गा येथे बकरी ईदनिमित्त ७ जून रोजी व उरसानिमित्त ८ ते १२ जून दरम्यान भाविकांना प्राण्यांची कुर्बानी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची मंगळवारी सुनावणी झाली.
विशाळगड किल्ल्यावर पशुबळी देण्यास मनाई आदेश लागू करण्यात आल्याने त्याविरोधात दर्गा ट्रस्टतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. ॲड. सतीश तळेकर व ॲड. माधवी अय्यपन यांनी याचिकादारांची बाजू मांडली. तर, सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील पी.पी. काकडे व ॲड. कविता सोळुंके यांनी काम पाहिले. दर्ग्यापासून सुमारे १.४ किमी अंतरावर खासगी जागेत बंदिस्त ठिकाणी कुर्बानी दिली जाईल, असे याचिकादारांच्या वतीने सांगण्यात आले.
खंडपीठाने दोन्ही बाजू ऐकून ७ ते १२ जून दरम्यान कुर्बानी करण्यास परवानगी दिली आहे. गतवर्षी याच स्वरुपाची याचिका उच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती. त्यावेळी दिलेल्या निकालाप्रमाणे यंदाही कुर्बानी देता येईल, मात्र निकालपत्रात दिलेल्या सर्व अटींची पूर्तता होणे गरजेचे आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले. सार्वजनिक जागी किंवा खुल्या जागी कुर्बानी न करता गट १९ येथील मुबारक मुजावर यांच्या खासगी, बंदिस्त जागेत करावी, अशी यामधील प्रमुख अट आहे.