मुंबई : मोठ्या बहिणीचे आई सतत कौतुक करत असल्याच्या रागात धाकट्या बहिणीने ७१ वर्षीय आईची निर्घृण हत्या केल्याची विदारक घटना चुनाभट्टी परिसरात गुरुवारी घडली. रेश्मा काझी (४१) असे या महिलेचे नाव असून हत्येनंतर ती स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाली. चुनाभट्टी पोलिसांनी तिला अटक केली आहे. मी आईची हत्या केली असल्याचा फोन रेश्माने भावाला केला होता.
कुर्ला येथे कुरेशी नगर परिसरात राहणाऱ्या साबीराबानू शेख (७१) यांची हत्या करण्यात आली आहे. त्यांना जैनब्बी नौशाद कुरेशी (४२) आणि रेश्मा या दोन मुली आणि मुलगा आहे. या सर्वांचे लग्न झाले असून, ते आईपासून काही अंतरावर राहतात. जैनब्बी या आईची काळजी घ्यायच्या. त्यामुळे साबीराबानू यांना देखील मोठ्या मुलीची ओढ जास्त होती. तसेच तिच्याविषयी नेहमीच रेश्मासमोर कौतुक करायच्या. मात्र, रेश्माला ते सहन न झाल्याने तिने बहिणीसोबत वादही घातला. याआधी २०२१ मध्ये हे प्रकरण चुनाभट्टी पोलिस ठाण्यात पोहचले होते.
गेल्या तीन महिन्यांपासून साबीराबानू यांच्या डाव्या डोळ्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्यांची जैनब्बी यांच्याकडे ये-जा वाढली. तसेच कधी रेश्माकडे गेल्यानंतर तिथेही जैनब्बी यांचे कौतुक करत असल्याने रेश्माचा राग आणखीन वाढला. अशात गुरुवारी त्या सायंकाळी साडेसहा वाजता त्या रेश्माकडे गेल्या. तिथे पुन्हा जैनब्बीचे कौतुक केल्याने रेश्माने चाकूने आईवर वार केले. आईने प्राण सोडल्याचे लक्षात येताच तिने भावासह नातेवाईकांना कॉल करून हत्या करून तिला घरात ठेवल्याचे सांगताच त्यांना धक्का बसला.
मोठीचे कौतुक केल्याने धाकटीने उचलले पाऊलभावाकडून जैनब्बीला समजताच तिने रेश्माचे घर गाठले. तेव्हा, रेश्मा घरात नव्हती. तर, आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या मदतीने त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. जैनब्बी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहेत.