ड्रग्ज तस्करीतून उभारलेल्या कोटींच्या साम्राज्यावर टाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2020 07:33 IST2020-11-28T07:32:41+5:302020-11-28T07:33:05+5:30

एटीएसची कारवाई : दाऊदच्या हस्तकासह १३ आरोपींची बँक खाती गोठवली

Heel on the multi-crore empire built from drug trafficking | ड्रग्ज तस्करीतून उभारलेल्या कोटींच्या साम्राज्यावर टाच

ड्रग्ज तस्करीतून उभारलेल्या कोटींच्या साम्राज्यावर टाच

मुंबई : ड्रग्ज तस्करीतून मिळालेल्या पैशांतून उभारलेल्या कोट्यवधीच्या साम्राज्यावर राज्य दहशतवादविरोधी पथकाने टाच आणली आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या १३ आरोपींची बँक खातीही गोठवली. यात दाऊद गँगच्या हस्तकाचाही समावेश आहे.

राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) विक्रोळी युनिटने गेल्या वर्षी अब्दुल रज्जाक कादर शेख, इरफान बादर शेख, सुलेमान जोहर शेख, जितेंद्र शरद परमार उर्फ आसिफ, नरेश मदन म्हसकर, सरदार उत्तम पाटील, जुबेर मोमिन, मोहम्मद सलीम अब्दुल हमीद मेमन, कैस सिद्दिकी, आवेश खान, मोहम्मद अझीस परयानी, मोहम्मद वसीम अब्दुल लतीफ शेख, मुस्तफा चारानिया उर्फ गुड्डू अशा तब्बल १३ तस्करांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध दोषारोप पत्रही दाखल केले. या कारवाईत १४६ किलो १४३ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. त्याची किंमत ५८ कोटी ५५ लाख ७२ हजार इतकी आहे.
आरोपींनी एमडीच्या विक्रीतून वाहने, बंगले, गाळा आणि दागिने खरेदी केले. त्यांच्याकडून १ कोटी ५५ लाख १९ हजार २९० रुपयांची रोकडही हस्तगत करण्यात आली आहे. तसेच ३ वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. यातील पाटील याने सांगलीत एमआयडीसी येथे ३ हजार १९५ चौरस मीटरचा गाळा खरेदी केला असून कैसने २०१९ मध्ये रायगडमध्ये फ्लॅट आणि गाळा खरेदी केला. याची एकूण किंमत ८० लाख ७५ हजार रुपये इतकी आहे.

‘साफेमा’अंतर्गत कारवाई
दाऊद गँगचा हस्तक असलेला आरोपी परयानीकडून ४१ लाख ४२ हजार किमतीचे दागिने, ३ लाख २० हजार किमतीची विदेशी बनावटीची घड्याळे तसेच अमेरिकन डॉलर जप्त करण्यात आले. स्मगलिंग ॲण्ड फॉरेन एक्सचेंज मॅनीपुलेटर्स अथाॅरिटीअंतर्गत (साफेमा) सर्व मालमत्ता गोठविण्यात आली आहे. साफेमा हा एक सरकारी विभाग आहे जो अर्थ मंत्रालयाच्या अख्यत्यारीत येतो.
 

Web Title: Heel on the multi-crore empire built from drug trafficking