पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 06:41 IST2025-10-27T06:41:26+5:302025-10-27T06:41:40+5:30
दिवाळीनंतरचा पहिला वार पाऊसवार

पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
मुंबई : दिवाळीनंतरचा पहिला रविवार महामुंबईसाठी ‘पाऊसवार’ ठरल्याने अनेकांच्या भेटीगाठींच्या नियोजनावर पाऊस पडला अन् त्यांची धावपळ झाली. मुंबई शहर विभागात २१.७६ मिमी, पूर्व उपनगरात १४. ५१ तर पश्चिम उपनगरांत १९.३० मिमी पावसाची नोंद झाली.
गेल्या २ दिवसांपासून मुंबईत अनेक ठिकाणी रिमझिम सरी कोसळल्या आहेत. येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
मुंबईत सकाळपासून पावसाचे वातावरण होते. मात्र दुपारनंतर अचानक पावसाच्या धारांनी वेग पकडल्याचे दिसून आले. रविवारी सरकारी कार्यालये, शाळा बंद असल्यामुळे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर ताण दिसला नसला तरी लोकांची धावपळ झाली. मात्र या पावसामुळे मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक बराच सुधारल्याचेही दिसून आले.
ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यासह नवी मुंबईतील अनेक भागात दुपारी जोरदार पाऊस पडला. त्यामुळे येथील नागरिकांची धावपळ झाली. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे आडोसा शोधण्यासाठी तारांबळ उडाली. अनेकांना भीजतच इच्छित स्थळ गाठावे लागले. शाळकरी विद्यार्थ्यांचीही दैना उडाली.
पावसाची नोंद (मिमीमध्ये)
शहर विभाग
भायखळा ३५.५७
मेमोनवाडा २८. ४०
ग्रॅण्ट रोड २६. ००
बीएमसी २४. ६०
पश्चिम उपनगरे
वांद्रे १९. ८३
पाली चिम्बई स्कूल १९. ६०
जुहू डिस्पेन्सरी १७. ४०
पूर्व उपनगरे
मानखुर्द १५. ४०
टी वॉर्ड १४. ८०
एम पूर्व वॉर्ड १४. २०
ऊन-पावसामुळे विचित्र हवामान
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत १४.६ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ६.६ मिमी पावसाची नोंद झाली. याचबरोबर ठाणे, नवी मुंबई भागातही पाऊस पडत आहे.
पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून काहीसा दिलासा मिळाला आहे. तापमानातही काहीशी घट झाली आहे. उकाड्याने काहिली झालेल्या मुंबईकरांना या पावसामुळे समाधान मिळाले.