‘त्या’मुळेच रुळांवर साचले पाणी : मध्य रेल्वे
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 05:51 IST2025-05-27T05:51:05+5:302025-05-27T05:51:14+5:30
मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेले

‘त्या’मुळेच रुळांवर साचले पाणी : मध्य रेल्वे
मुंबई : मुंबईत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचे रूळ पाण्याखाली गेले. दादर, शीव, कुर्ला, मशीद आणि सॅण्डहर्स्ट रोड स्थानकांदरम्यान पाणी साचल्याने लोकल सेवा खोळंबली. दरम्यान, महापालिकेच्या ड्रेनेज लाइन्स ओव्हरफ्लो झाल्यामुळे रेल्वे रुळांवर पाणी साचल्याची टीका मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी सोशल मीडियावर केली.
मुंबईत सोमवारी सकाळी सरासरी २५२ मिमी पावसाची नोंद झाली. तब्बल २४ वर्षांनंतर यंदा मे महिन्यात मान्सूनचे आगमन झाले. मात्र, पहिल्याच पावसात रेल्वे प्रशासनाची तयारी अपुरी असल्याचे स्पष्ट झाले. अनेक ठिकाणी रुळांवर पाणी साचले. रेल्वे प्रशासनाने तयारी केली असली, तरी महापालिकेची पम्पिंग स्टेशन वेळेत सुरू न झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे सांगण्यात आले.
पम्पिंग स्टेशन कार्यान्वित झालीच नाहीत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि भायखळा परिसरात मध्य रेल्वेने दोन पम्पिंग स्टेशन उभारली आहेत. हे पाणी अनुक्रमे ओएनजीसी यलो गेट आणि महालक्ष्मी परिसराजवळ बाहेर सोडले जाते. मात्र, ही दोन्ही पम्पिंग स्टेशन वेळेवर कार्यान्वित न झाल्यामुळे पाणी रुळांवर साचल्याचे उघड झाले.
महालक्ष्मी पम्पिंग स्टेशन सकाळी ११.३० च्या सुमारास सुरू करण्यात आले. त्याच वेळेस सकाळी ११:२४ वाजता ४.७५ मीटर भरती आल्याने पूर दरवाजे जवळपास एक तास आधी बंद करावे लागले.
परिणामी पाणी बाहेर जाण्यात अडथळा निर्माण झाला, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. महापालिकेकडून याबाबत खुलासा आलेला नाही.