मुंबईत मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी; हवामान विभागाने दिल्या खबरदारीच्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 10:47 AM2023-06-25T10:47:10+5:302023-06-25T10:47:34+5:30

गेल्या २४ तासांत मुंबईत १७६.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Heavy rains in Mumbai, orange alert issued; Precautionary instructions issued by Meteorological Department | मुंबईत मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी; हवामान विभागाने दिल्या खबरदारीच्या सूचना

मुंबईत मुसळधार पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी; हवामान विभागाने दिल्या खबरदारीच्या सूचना

googlenewsNext

मुंबई: कालपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसेच मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढील ४८ तासांत मोसमी वारे मुंबईत दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या २४ तासांत मुंबईत १७६.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी सगळ्यात जास्त पाऊस ५.३० ते ७.३० या वेळेत पडला आहे. या काळात ८८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. हवामान विभागाने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. तर पुढील ५ दिवस राज्यांतील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात आणि विदर्भात काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

शनिवारी संध्याकाळपर्यंत मुंबई, नवी मुंबईच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली होती. मात्र, मुंबईत मोसमी वारे दाखल झालेले नाहीत. त्यामुळे सध्या सुरु असणारा पाऊस हा पूर्व मोसमी पाऊस असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच गेल्या २४ तासांत नैऋत्य मोसमी वारे सक्रीय झाले असून त्यामुळे दक्षिण कोकण भागातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. 

ठाणे जिल्ह्यात सर्वत्र संततधार

ठाणे, कल्याण- डोंबिवली, अंबरनाथ, भिवंडी आणि मुरबाड तालुक्यात शनिवारी पावसाची संततधार सुरू होती, जिल्ह्यातील इतर भागांतही पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जिल्ह्याभरात शनिवारी सरासरी ५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली. जिल्हाभरात शनिवारपर्यंत सरासरी ३९ मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली आहे.

पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची वर्दी

दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर शनिवारी दुपारी पालघर जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आणि उष्णतेने हैराण झालेल्या जिल्हावासियांना काहीसा दिलासा मिळाला. शनिवार सकाळपासून जिल्ह्यात बहुताश तालुक्यात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर अनेक ठिकाणी पावसाने वर्दी दिली. विक्रमगड, डहाणू, पालघर, वसई, तलासरी, आदी तालुक्यात रिमझिम पाऊस सुरु झाला. तर ग्रामीण भागात सायंकाळनंतर मात्र पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात गारवाही निर्माण झाला आहे.

रायगडमधील बळीराजा सुखावला

पावसाने दडी मारल्याने रायगड जिल्ह्यात पाणी टंचाईसह खरीप हंगाम धोक्यात आला होता. धूळवाफेवर केलेल्या पेरण्या दुबार करण्याची वेळ आली होती. मात्र, शुक्रवारी रात्री जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली, तर शनिवार दिवसभर सर्वदूर दमदार पाऊस झाला. यामुळे टंचाईची दाहकता काहीशी कमी होणार असून खरिपाची लगबग सुरू झाली आहे. शनिवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

Web Title: Heavy rains in Mumbai, orange alert issued; Precautionary instructions issued by Meteorological Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.