मुंबई : शिकत असलेल्या आरोपीला कारावासामुळे शिक्षण न घेता येणे म्हणजे त्याच्या शिक्षेत अधिक भर घातल्यासारखे आहे, असे म्हणत न्यायालयाने मकोका लावण्यात आलेल्या विद्यार्थ्याची जामिनावर सुटका केली.
आरोपीला कारागृहात ठेवले तर तो कट्टर गुन्हेगार बनेल. कारण तो त्याच्याबरोबरचे आरोपी तशाच पद्धतीने आयुष्यात पुढे जाताना पाहील, असे न्या. मिलिंद जाधव यांच्या एकलपीठाने म्हटले.
अर्जदार विद्यार्थी आहे. या वयात त्याचे शिक्षण थांबले आहे. त्याला अधिक काळ कारावसात ठेवल्यास तो दृष्टचक्रात अडकण्याची शक्यता आहे. तो कट्टर गुन्हेगार बनण्याची शक्यता आहे. भविष्यात तो समाजासाठी धोका ठरू शकतो. तो जर पुन्हा पुस्तकांत रमला तर त्याच्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला सुधारण्याच्या प्रत्येक संधीचा विचार न्यायालयाने केला पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले.
'सरकारी वकिलांचा तीव्र आक्षेप असतानाही बारावीमध्ये त्याने लागलीच प्रवेश घ्यावा आणि त्याने शिक्षण चालू ठेवावे', असे न्यायालयाने म्हटले.
विद्यार्थ्याबद्दल न्यायालय काय म्हणाले?
तुरुंगवास भोगत असलेल्या विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होते. त्याची भरपाई संपत्तीने केली जाऊ शकत नाही. त्यामुळे त्याला नैराश्य घेरेल आणि हे नैराश्य बंडखोरीचे रूप धारण करून त्याला कट्टर गुन्हेगार बनवेल. अर्जदाराने एकदा न्यायालयाचा विश्वास जिंकला की, तो स्वतःमध्ये सुधारणा करेल आणि स्वतःचे पुनर्वसन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल. कायद्याचे पालन करणारा नागरिक असे दाखवून देण्याची संधी अर्जदाराला दिली पाहिजे. आरोपीला कारावासामुळे शिक्षण न घेता येणे म्हणजे शिक्षेत अधिक भर घातल्यासारखे आहे, असे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने मुलाची जामिनावर सुटका केली.