'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 19:09 IST2025-11-15T19:09:00+5:302025-11-15T19:09:41+5:30
मुंबईच्या हितासाठी महाविकास आघाडीची मजबुती अत्यंत महत्त्वाची आहे. काँग्रेसच्या निर्णयाने या एकतेला धक्का बसला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संवाद, समन्वय आणि आघाडी टिकवण्याच्या प्रयत्नात शेवटपर्यंत सक्षम आणि बांधील आहे, असंही मातेले म्हणाले.

'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसात जाहीर होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी केली आहे. आज काँग्रेसचा मुंबईत मेळावा झाला. या मेळाव्यासाठी काँग्रेस प्रभारी रमेश चिन्नथला उपस्थित होते. यावेळी त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, आता त्यांच्या या विधानावनरुन राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई युवक अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
'बिहारचा धडा विसरलेली काँग्रेस बिहारमध्ये विरोधक विखुरले आणि सत्ताधाऱ्यांना सरळ बहुमत मिळाले. महाविकास आघाडी तुटली की परिणाम किती घातक होऊ शकतात, याचे ताजे उदाहरण बिहार आहे. मुंबईतही तेच चित्र निर्माण करण्याची भीषण चूक काँग्रेसच्या नेतृत्वाकडून होताना दिसते. आघाडीतील विश्वास, संवाद आणि सन्मान या तीनही गोष्टींना काँग्रेसच्या निर्णयाने धक्का बसला आहे.काँग्रेसच्या काही नेत्यांची भूमिका संशयास्पद ‘सुपारी’ प्रश्न अनाठायी नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार प्रदेश प्रवक्ते व युवक मुंबई अध्यक्ष – ॲड. अमोल मातेले म्हणाले.
मुंबईच्या हितासाठी महाविकास आघाडीची मजबुती अत्यंत महत्त्वाची आहे. काँग्रेसच्या निर्णयाने या एकतेला धक्का बसला असला तरी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संवाद, समन्वय आणि आघाडी टिकवण्याच्या प्रयत्नात शेवटपर्यंत सक्षम आणि बांधील आहे, असंही मातेले म्हणाले.
काँग्रेसमधील काही नेते गेल्या काही दिवसांत असमंजस भूमिका आघाडीविरोधी वक्तव्ये आणि भाजपला अप्रत्यक्ष फायदा होईल असे निर्णय घेताना दिसत आहेत. म्हणूनच हा गंभीर प्रश्न उपस्थित होतो.काँग्रेसच्या ठराविक गटांनी पक्षाला कमकुवत करण्याची, आघाडी तोडण्याची आणि भाजपला फायदा करून देण्याची ‘सुपारी’ घेतली आहे का?, असा सवालही मातेले यांनी केला.