मुस्लिमांविरोधात द्वेषपूर्ण भाषण; विक्रम पावसकरांवर खटला चालविण्यास सरकारचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 16:00 IST2025-03-06T15:58:59+5:302025-03-06T16:00:06+5:30

मुंबई : मुस्लिमांविरोधात द्वेषपूर्ण भाषण केल्याबद्दल दोन प्रकरणांत भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यावर खटला चालविण्यास राज्य सरकारने ...

hate speech against Muslims Government's refusal to prosecute Vikram Pawaskar | मुस्लिमांविरोधात द्वेषपूर्ण भाषण; विक्रम पावसकरांवर खटला चालविण्यास सरकारचा नकार

मुस्लिमांविरोधात द्वेषपूर्ण भाषण; विक्रम पावसकरांवर खटला चालविण्यास सरकारचा नकार

मुंबई : मुस्लिमांविरोधात द्वेषपूर्ण भाषण केल्याबद्दल दोन प्रकरणांत भाजपचे माजी प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यावर खटला चालविण्यास राज्य सरकारने मंजुरी देण्यास नकार दिला, अशी माहिती उच्च न्यायालयाला बुधवारी देण्यात आली.

मुस्लिमांविरोधात द्वेषपूर्ण भाषण केल्याबद्दल सातारा येथील दोन वेगवगेळ्या पोलिस ठाण्यांत पावसकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, गृह विभागाने पावसकर यांच्यावर खटला चालविण्यास मंजुरी देण्यास नकार दिला, अशी माहिती मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांनी न्या. रेवती मोहिते डेरे व न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाला दिली.

पावसकर यांच्यावर खटला चालविण्यासठी सरकारच्या मंजुरीची आवश्यकता नाही, अशा आयपीसीच्या अन्य कलमांतर्गत पावसकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला का? असा प्रश्न खंडपीठाने केला. त्याबाबत उत्तर देताना वेणेगावकर यांनी म्हटले की, त्यांनी केलेल्या भाषणाचे काहीही पडसाद न उमटल्याने त्यांच्यावर अन्य कोणत्याही कलमांतर्गत गुन्हा दाखल केला नाही.
‘हे काय आहे? काही घडले नाही? द्वेषयुक्त भाषण केल्यानंतर लगेचच गुन्हा घडला. तुम्ही परिणामांची वाट पाहू शकत नाही,’ असे न्या. डेरे यांनी म्हटले.

मंजुरी देणाऱ्या सक्षम प्राधिकरणाने अशा प्रकरणांत सारासार विचार करणे अपेक्षित आहे, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. पावसकर यांच्यावर १५३ (ए) व २९५ व्यतिरिक्त आयपीसी कलम २९८ (मुद्दाम भावनिक धार्मिक दुखावण्याचे कृत्य)अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यासाठी सरकारच्या मंजुरीची आवश्यकता नाही. त्यामुळे या कलमाअंतर्गत पावसकर यांच्यावर कारवाई करणार की नाही? अशी विचारणा न्यायालयाने वेणेगावकर यांच्याकडे केली.

याबाबत सूचना घ्यावी लागेल, असे वेणेगावकर यांनी मुदत मागितली. न्यायालयाने तीन आठवड्यांची मुदत देत सरकारला पावसकर यांच्यावर कलम २९८ अंतर्गत आरोपपत्र दाखल करणार की नाही, याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.

Web Title: hate speech against Muslims Government's refusal to prosecute Vikram Pawaskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.