Video: तुतारी पोहोचली का गावात? सुप्रिया सुळेंचा फोन; बारामतीकर म्हणाला आम्ही दादांसोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 11:35 AM2024-03-02T11:35:32+5:302024-03-02T11:39:56+5:30

पवार कुटुंबातील दोन व्यक्ती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून आमने-सामने आल्याचे बघायला मिळण्याची शक्यता आहे

Has Tutari reached the village? Phone of Supriya Sule; Baramatikar said we are with Dada ajit pawar | Video: तुतारी पोहोचली का गावात? सुप्रिया सुळेंचा फोन; बारामतीकर म्हणाला आम्ही दादांसोबत

Video: तुतारी पोहोचली का गावात? सुप्रिया सुळेंचा फोन; बारामतीकर म्हणाला आम्ही दादांसोबत

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर पवार कुटुंबातही राजकीय दुफळी झाली आहे. त्यातच, आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही आक्रमक बनला असून ती जागा स्वत:च्या पदरात पाडून घेण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी थेट तुतारीच्या चिन्हासह आपला उमेदवारी फोटो शेअर करत एकप्रकारे उमेदवारीच जाहीर केली. मात्र, ही उमेदवारी जाहीर नसून माझी पक्षाकडे विनंत असणार आहे, असे सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले. त्यातच, सध्या एक कॉल रेकॉर्डींग समोर आलं असून सुप्रिया सुळेंनी बारामती मतदारसंघात प्रचाराला सुरूवात केल्याचं दिसून येत आहे. 

पवार कुटुंबातील दोन व्यक्ती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून आमने-सामने आल्याचे बघायला मिळण्याची शक्यता आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीकडून, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीकडून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सुनेत्रा पवार यांचे जोरदार प्रयत्नही सुरू असून त्या लोकसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. अशातच सुप्रिया सुळे यांनी काल त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट आणि व्हॉट्सअॅप स्टेटसवर शेअर केलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरली. या पोस्टमधून सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षरित्या आपली उमेदवारी जाहीर केल्याचंच दिसत होतं. त्यानंतर, आता तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह असल्याचे सांगत प्रचारही सुरू केला आहे. 

खासदार सुप्रिया सुळे यांचे एक ऑडिओ कॉल रेकॉर्डींग व्हायरल झालं आहे. सोशल मीडियातून हे रेकॉर्डींग समोर आलं असून त्यात, सुप्रिया सुळे आपल्या तुतारी चिन्हाचा प्रचार करताना मतदाराशी संवाद साधत आहेत. मात्र, सुप्रिया सुळेंशी फोनवर संभाषण करणारा मतदार बोलताना थोडासा दबावात दिसून येतो. अखेर, तो सुप्रिया सुळेंना स्पष्टपणे सांगतो की, ताई आम्ही वहिनींचं काम करत आहोत, आम्ही दादांसोबत आहोत. सध्या सोशल मीडियावर हे कॉल रेकॉर्डींग चांगलंच व्हायरल होताना दिसून येते.    

कॉल रेकॉर्डींगमधील संवाद

हॅलो, सुप्रियाताई बोलणार आहेत. 

सुप्रिया सुळे - हॅलो, मी सुप्रिया सुळे बोलतेय

बारामतीकर - नमस्कार, ताई

सुळे - नमस्कार, आपला तुतारीवाला माणूस पोहोचला का नाही गावात?

बारामतीकर - नाही ताई

सुळे - अरे माझं चिन्ह आहे आता, तुतारीवाला माणूस, पक्षाचं चिन्ह पोहोचलं का नाही तुम्हाला

बारामतीकर - ताई, आम्ही वहिंनीचं काम करतोय, दादांचं. 

सुळे -  करा, मी तुम्ही माझे मतदार आहात ना, मग माझं कर्तव्य आहे, ही लोकशाही आहे

असा संवाद व्हायरल फोनकॉलवरील ऐकायला मिळतो. 

तिकीटाची मागणी करणार

केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह दिलं आहे. याच चिन्हासह फोटो शेअर करत सुप्रिया सुळे यांनी मतदारांना आवाहन केलं होतं. यातून तुम्ही तुमची उमेदवारी जाहीर केली आहे का, असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना खासदार सुळे यांनी म्हटलं की, "ही माझ्या उमेदवारीची घोषणा नसून मी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे तिकीट मागण्यासाठी केलेली विनंती आहे," असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

Web Title: Has Tutari reached the village? Phone of Supriya Sule; Baramatikar said we are with Dada ajit pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.