बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 09:33 IST2025-07-20T09:33:23+5:302025-07-20T09:33:47+5:30

जे. जे. रुग्णालयातील बालरोग विभाग प्रमुखाच्या त्रासाला कंटाळल्याचा आरोप करत बालरोग विभागातील निवासी डॉक्टरांनी शनिवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

Harassed by the head of the pediatric department, resident doctors' protest continues in 'JJ'! | बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

बालरोग विभागाच्या प्रमुखाकडून त्रास, ‘जे जे’मध्ये निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच! 

मुंबई : जे. जे. रुग्णालयातील बालरोग विभाग प्रमुखाच्या त्रासाला कंटाळल्याचा आरोप करत बालरोग विभागातील निवासी डॉक्टरांनी शनिवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी एका महिला निवासी डॉक्टरने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचीही घटना घडली आहे. याप्रकरणी जे.जे. रुग्णलायतील बालरोग विभागाच्या प्रमुखाला पदावरून हटविले असून, त्याच विभागातील दुसऱ्या प्राध्यापकाला कार्यभार सोपविला आहे. मात्र, निवासी डॉक्टरांनी विभाग प्रमुखाला तत्काळ निलंबित करा, अशी मागणी करत आंदोलन सुरू ठेवले. या आंदोलनाला राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

निवासी डॉक्टरांच्या मध्यवर्ती संघटनेने बालरोग निवासी डॉक्टरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ याना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी  या विभागातील एक  निवासी डॉक्टराने आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना केवळ एक अपवाद नसून, दीर्घकाळ चालत आलेला मानसिक छळ आहे. या घटनेनंतर जे.जे. रुग्णालयातील मार्डच्या नेतृत्वाखाली निवासी डॉक्टरांनी निषेध आंदोलन सुरू केले. तसेच ‘सेंट्रल मार्ड’ या आंदोलनाला  पाठिंबा दिला.

सद्य:स्थितीत कार्यरत असलेल्या बालरोग विभाग प्रमुखांना चौकशी होईपर्यंत तत्काळ निलंबित करावे, विभागातील मानसिक छळ आणि विषारी कार्यपद्धतीबाबत  स्वतंत्र वेळेच्या चौकटीत चौकशी करण्यात यावी, सर्व विभागांतील निवासी डॉक्टरांसाठी मानसिक आरोग्य चांगले राहावे, तसेच त्याची सुरक्षितता या योग्य पद्धतीने राहाव्यात यासाठी  तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करा, आदी मागण्या डॉक्टरांनी केल्या आहेत.

बालरोग विभागातील निवासी डॉक्टरांचा विभाग प्रमुखांकडून छळ केला जात आहे. आम्ही आमच्या मागण्याचे निवेदन वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना दिले आहे. आमचा निवासी डॉक्टरांना पाठिंबा आहे. त्यांना न्याय न मिळाल्यास आम्हीही संपात सहभागी होणार आहोत, असे महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेच्या जनरल सेक्रेटरी, डॉ. अदिती कानडे यांनी म्हटले.

आमच्या स्तरावर जी कार्यवाही अपेक्षित होती, ती आम्ही केली आहे. सोमवारी याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामार्फत चौकशी केली जाणार आहे, असे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार म्हणाले. 

हमी देण्याची मागणी
राज्यातील कोणत्याही वैद्यकीय शिक्षण संस्थेमध्ये अशा प्रकारचे विषारी वातावरण सहन केले जाणार नाही, याची शासनाकडून ठाम हमी द्यावी, अशी मागणी आंदोलनकर्त्या डाॅक्टरांनी केली.

Web Title: Harassed by the head of the pediatric department, resident doctors' protest continues in 'JJ'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.