- मनीषा म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कुर्ल्यात बेस्ट बसच्या झालेल्या भीषण अपघातप्रकरणीकुर्ला पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवत बेस्ट बस चालक संजय मोरे (५४) याला अटक केली आहे. मोरे हा कंत्राटी पद्धतीने बेस्ट उपक्रमात चालक म्हणून कार्यरत असून त्याला इलेक्ट्रिक बस चालविण्याचा फारसा अनुभव नव्हता, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. न्यायालयाने आरोपी चालक मोरे याला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
कुर्ला पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण (३५) यांनी पोलिसांतर्फे फिर्याद नोंदवत याप्रकरणी कुर्ला पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम १०५, ११०, ११८(१), ११८(२) आणि ३२४ (५) अन्वये गुन्हा दाखल करून बेस्ट बस चालक संजय मोरे याला अटक केली आहे. अटकेनंतर, सोमवारी दुपारी कुर्ला येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक ५१ मध्ये टॅक्सीतून त्याला न्यायालयात हजर केले. यावेळी सरकारी वकिलांनी आरोपी मोरेच्या सात दिवसांच्या कोठडीची मागणी केली. याला आरोपी मोरेचे वकील समाधान सुलाने यांनी विरोध केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायाधीश एस. एम. गौरगोंड यांनी आरोपी मोरे याला २१ डिसेंबरपर्यंत कोठडीचे आदेश दिले. पोलिसांनी सुरुवातीला जमावाच्या भीतीने व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी घेण्याची विनंती केली. मात्र, न्यायालयाने त्याला नकार दिल्यानंतर दुपारच्या सुमारास मोरेला न्यायालयात हजर करण्यात आले होते.
घाटकोपर पश्चिमेकडील असल्फा परिसरात कुटुंबासोबत राहत असलेला मोरे १९८९ पासून वाहन चालक असल्याचे त्याच्या जवळ सापडलेल्या वाहन चालक परवान्यावरून उघड झाले आहे. मोरे कोरोनामध्ये २०२० बेस्टमध्ये कंत्राटी पद्धतीने नोकरीला लागला. तेव्हापासून संजय मोरे बेस्टच्या बस चालवतो. मोठी इलेक्ट्रिक बस चालविण्याचे अवघे तीन दिवस प्रशिक्षण घेतल्यानंतर १ डिसेंबरपासून ही बस चालवयला सुरुवात केली होती.
अधिकाऱ्यांची होणार पोलिस चौकशीपोलिसांनी आरोपी चालक संजय मोरे याच्याकडून अवजड वाहन चालविण्याचा परवाना जप्त केला आहे. मोरेला अन्य वाहनांसह मिनी बस चालविण्याचा अनुभव होता; पण इलेक्ट्रिक बस चालविण्याचा अनुभव नव्हता, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. यामुळेच ब्रेकऐवजी एक्सिलेटरवर पाय पडल्याने अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यामुळे मोरेची नियुक्ती करणाऱ्या बेस्ट प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची पोलिस चौकशी करणार आहेत.