जय हो! धारावीतला पहिला आर्मी ऑफिसर; अर्धांगवायूग्रस्त पेंटर बापाचा 'साहेब' लेक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2024 01:41 PM2024-03-10T13:41:04+5:302024-03-10T13:43:42+5:30

धारावीतल्या एका लहानशा घरात राहणाऱ्या उमेश कीलूने आपल्या स्वप्नांना बळ देत गगन भरारी घेतली आहे

Hail! First Army Officer in Dharavi; 'Saheb' lake of paralyzed painter father of umesh keelu of dharavi | जय हो! धारावीतला पहिला आर्मी ऑफिसर; अर्धांगवायूग्रस्त पेंटर बापाचा 'साहेब' लेक

जय हो! धारावीतला पहिला आर्मी ऑफिसर; अर्धांगवायूग्रस्त पेंटर बापाचा 'साहेब' लेक

मुंबई - राजधानी मुंबईतीलधारावी झोपडपट्टी म्हणलं की, देशाच्या आर्थिक राजधानीची दुसरी बाजू दाखवणारं चित्र. घराला चिकटून लहान-लहान घरं, झोपड्या, ना आतमध्ये जाण्यासाठी नीट रस्ता, ना रस्ते, पाणी, वीज यांसारख्या सुविधा. अर्थातचं, कामगार, मजूर आणि अत्यल्प गरीबांच्या हजारो घरांची वस्ती म्हणजे धारावी. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असाही धारावीचा लौकीक आहे. मुंबईची ही धारावी गुन्हेगारी जगतासाठीही प्रसिद्ध आहे. मात्र, याच धारावीतून काही कोहिनूरही चमकले आहेत. अभिनेता जॉनी लिव्हरही याच धारावीचे सुपुत्र आहेत. आता, याच धारावीतून पहिला आर्मी अधिकारी बाहेर पडला आहे. 

धारावीतल्या एका लहानशा घरात राहणाऱ्या उमेश कीलूने आपल्या स्वप्नांना बळ देत गगन भरारी घेतली आहे. हालाकीची परिस्थिती, कष्टकरी आणि मजुरी करणारा सभोवताल, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठीही दैनिक धडपड असतानाही उमेशने भारतीय सैन्य दलातील अधिकारी वर्गाची परीक्षा उत्तीर्ण करुन सैन्यचा गणवेश स्वत:च्या कर्तृत्वाने अंगावर चढवला. चेन्नईतील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमध्ये पासिंग आऊट परेडचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणानंतर उमेश आता लेफ्टनंट उमेश कीलू बनले आहेत. आपल्या धारावीच्या लेकाचा हा गौरव आणि रुबाब पाहण्यासाठी धारावीतील मंडळीही जमली होती. 

उमेश कीलूचा जन्म मुंबईतील धारावीच्या सायन कोळीवाडा झोपडपट्टीत झाला. येथील १० बाय ५  फुटांच्या घरातच तो आपल्या कुटुंबासह वाढला. आर्थिक अडचणींचा सामना करतच त्याने शैक्षणिक प्रवासही सुरूच ठेवला. उमेशने माहिती व तंत्रज्ञान विषयात B.Sc केल्यानंतर Computer Science मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले. त्यातच, एनसीसी एअर विंगशी असलेल्या संबंधामुळे त्याला सी प्रमाणपत्र मिळाले. दरम्यानच्या काळात कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सायबर कॅफेत काम केलं. त्यानंतर, टाटा कन्सल्टन्सीतही त्याने काम करुन आपली आर्थिक गरज भागवली. गेल्या काही महिन्यांपासून सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डची परीक्षा (एसएसबी) पास होण्यासाठी त्याने तब्बल १२ वेळा प्रयत्न केले. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले असून आता भारतीय सैन्य दलाच्या प्रतिष्ठित अकादमीमध्ये तो अधिकारी बनला आहे. 

माझे वडील पेंटर होते.  2013 मध्ये त्यांना अर्धांगवायू झाला आणि तेव्हापासून ते अंथरुणाला खिळून होते. सैन्य प्रशिक्षणासाठी रिपोर्ट करण्याच्या एक दिवस आधी मार्च 2023 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. आज मी माझे 11 महिने प्रशिक्षण पूर्ण केले आणि सैन्यात एक कमिशन्ड ऑफिसर आहे.", असे उमेशने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले. तर, ''मला आशा आहे की मी त्या भागातील (धारावी, मुंबई) पहिला अधिकारी होईन आणि हा खूप अभिमानाचा क्षण आहे. तेथे प्रचंड बेरोजगारी आहे आणि मला आशा आहे की ते देखील माझ्याकडून प्रेरित होऊन सैन्यात सामील होतील,'', असे उमेशने पीटीआयशी बोलताना म्हटले. 

दरम्यान, उमेशच्या प्रशिक्षणानंतर त्याचं अभिनंदन करण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांसह धारावीतील शेजारी, मित्र मंडळीही मोठ्या आनंदाने चेन्नईतील प्रशिक्षण केंद्रात पोहोचले होते. 
 

Web Title: Hail! First Army Officer in Dharavi; 'Saheb' lake of paralyzed painter father of umesh keelu of dharavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.