दोषीला मृत्युदंड नको; जन्मभर तुरुंगात ठेवा -अभिनेत्री वहिदा रहमान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 01:23 IST2019-12-10T01:22:45+5:302019-12-10T01:23:16+5:30
कोणाला मारून टाकणे आपल्या हाती नाही

दोषीला मृत्युदंड नको; जन्मभर तुरुंगात ठेवा -अभिनेत्री वहिदा रहमान
मुंबई : हैदराबादेत पशुवैद्यक तरुणीवर झालेला सामूहिक बलात्कार आणि नंतर हत्या यावर तीव्र संताप व्यक्त करून ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान म्हणाल्या की, बलात्कार हा भयानक व अक्षम्य गुन्हा आहे. दोषीला जन्मठेप व्हावी, मृत्युदंड नको.
पशुवैद्यक तरुणीवर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही संशयित ६ डिसेंबर रोजी हैदराबादेत पोलीस चकमकीत मारले गेले. या चकमकीबद्दल पोलिसांची प्रशंसा होत असल्याबद्दल विचारले असता रहमान रविवारी वार्ताहरांशी बोलताना म्हणाल्या की, बलात्कारासारखे गुन्हे हे भयानक असून अक्षम्यही आहेत; परंतु मला आताही असे वाटते की, कोणाला मारून टाकणे आपल्या हाती नाही.
बलात्काºयाला जन्मभर तुरुंगात ठेवले पाहिजे. त्यांना आयुष्यभर सडू दिले पाहिजे. बलात्कारातील आरोपी जर प्रत्यक्ष गुन्हा करताना हाती लागला तर त्याच्यावर कसला खटला भरायचा? तुम्ही जनतेचा पैसा वाया घालवता आहात, असे मत त्यांनी व्यक्त केले.