अधिवेशनात एकमेकांना दुरूनच नमस्कार!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 01:47 AM2020-09-08T01:47:51+5:302020-09-08T01:47:57+5:30

कोरोनामुळे पुन्हा छोट्या आकारातील पाण्याच्या बाटल्या वापरल्या जात होत्या.

Greet each other from afar at the convention! | अधिवेशनात एकमेकांना दुरूनच नमस्कार!

अधिवेशनात एकमेकांना दुरूनच नमस्कार!

Next

- अतुल कुलकर्णी 

मुंबई : दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनावर पूर्णपणे कोरोनाचे सावट आहे. हस्तांदोलन टाळून प्रत्येकजण हात जोडून नमस्कार करत होते. मंत्र्यांच्या दालनात प्रत्येकाच्या टेबलवर काचेची भिंत उभी करण्यात आली आहे. विधानभवनाच्या बाहेर वेगवेगळे स्टॉल तयार करण्यात आले होते. आत जाणाऱ्या प्रत्येकाचा अहवाल तपासला जात होता. जे लोक निगेटिव्ह आलेले आहेत अशांना रिपोर्ट पाहून आत सोडले जात होते. सकाळी काही आमदारांचे रिपोर्ट निगेटिव्ह असूनही त्याची नोंद विधानभवन कॉम्प्युटरवर झालेली नव्हती, शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप करून त्या आमदारांना आत मध्ये घेतले.

सभागृहात देखील दोन जागा सोडून एक सदस्य अशी बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक आमदार प्रेक्षक गॅलरीत बसले होते. काही आमदार सभागृहात मास्क काढून एकमेकांशी बोलत होते. ते पाहून अजित पवार यांनी मास्क लावला नाही तर अध्यक्षांना सांगून सभागृहाबाहेर काढेल, अशी समज दिली. त्यानंतर प्रत्येकांनी मास्क लावले. आत येताना प्रत्येक आमदाराला मास्क, सॅनिटायझरची बाटली, फेस शील्ड देण्यात आले होते. सभागृहात देखील प्रत्येक सदस्य सतत आपल्या हाताला सॅनिटायझर लावताना दिसत होते.  अधिवेशनाच्या निमित्ताने मंत्र्यांकडे होणारी जेवणं या वेळी कुठेही नव्हती. कोणी कोणाला जेवण करणार का? चहा पिणार का? असेही विचारत नव्हते. प्लास्टिक बंदीनंतर मंत्रालयातून आणि विधानभवनातून पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या हद्दपार झाल्या होत्या.

कोरोनामुळे पुन्हा छोट्या आकारातील पाण्याच्या बाटल्या वापरल्या जात होत्या. विधान भवनात सगळे निगेटिव्ह लोक जमा झाले आहेत, अशी मिश्किल टिप्पणी आमदार एकमेकांशी बोलताना करत होते. सभागृहात बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मास्क काढून बोलत होते. बोलताना ते मध्येच थोडेसे खाकरत होते, तेव्हा बसल्या जागेवरून काही सदस्य त्यांना मास्क लावा, असे इशारे करत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पूर्णवेळ सभागृहात हातमोजे घालून आणि मास्क लावून बसले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात असेपर्यंत स्वत:च्या मास्कला हात लावला नाही. सभागृहात मुख्यमंत्र्यांची किंवा मंत्र्यांशी जवळ येउन सदस्य कानाशी लागून बोलताना नेहमी दिसतात. मात्र हे चित्र देखील आज दिसत नव्हते. मंत्र्यांच्या दालनात आमदारांनी काही पत्र दिले की, मंत्री पत्र घेऊन घेत होते आणि आमदार निघून गेले की आपले हात सॅनिटायझरने पुसत होते. इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींची गर्दी वगळता अधिकारी आणि अन्य पत्रकारांची गर्दी देखील तुरळक होती.

Web Title: Greet each other from afar at the convention!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.