मुंबईमध्ये आता हरित इमारत उपक्रम, वातावरण सुधारण्यासाठी बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 13:08 IST2025-02-06T13:07:55+5:302025-02-06T13:08:59+5:30
केंद्र सरकारच्या 'नेट झिरो वेस्ट' संकल्पनेंतर्गत पालिकेच्या सांताक्रूझ विभागीय कार्यालय परिसरातही एक नवीन इमारत बांधली जाणार आहे.

मुंबईमध्ये आता हरित इमारत उपक्रम, वातावरण सुधारण्यासाठी बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई : बिघडलेले पर्यावरण सुधारण्यासाठी मुंबई महापालिका गेल्या वर्षभरापासून विविध उपाययोजना करत आहे. त्यानुसार पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली असून त्याच दृष्टिकोनातून आता 'हरित इमारत' उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या 'नेट झिरो वेस्ट' संकल्पनेंतर्गत पालिकेच्या सांताक्रूझ विभागीय कार्यालय परिसरातही एक नवीन इमारत बांधली जाणार आहे. या संकल्पनेत पूर्णपणे सौर ऊर्जेचा वापर होऊन 'शून्य कचरा' अंमलबजावणीवर भर दिला जातो.
२०२४ साली पालिकेने जगातील सर्वात मोठा 'डोमेस्टिक रुफटॉप सोलार' उपक्रमही हाती घेतला आहे.
पर्यावरणपूरक स्मशानभूमी
वायू प्रदूषण कमी करण्यासाठी २०२५-२६ मध्ये पाच स्मशानभूमींचे 'पीएनजी' इंधनावर आधारित स्मशानभूमीत रूपांतर होणार आहे. तसेच पालिकेच्या नऊ स्मशानभूर्मीमध्ये 'पर्यावरणपूरक' शवदाहिनी सुरू होणार आहे. वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्याकरिता लाकडाऐवजी पीएनजी अथवा शेणाच्या पर्यावरणपूरक शवदाहिनी वापरण्यावर भर देण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत.
मूर्तिकारांना शाडू माती देणार
पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्यासाठी मूर्तिकारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने मागील वर्षी पालिकेने ६११ टन शाडूच्या मातीचे मोफत वाटप केले होते. याही वर्षी हा उपक्रम राबवला जाणार आहे. आता तर प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्ती बनवण्यावर न्यायालयानेच बंदी घातली आहे. त्यामुळे आगामी उत्सवात शाडूच्या मातीचा वापर मोठ्या प्रमाणावर होण्याची अपेक्षा आहे.
१०० टक्के सांडपाणी संकलन-व्यवस्थापन
'स्वच्छ भारत २.० 'च्या उद्दिष्टांमध्ये १०० टक्के सांडपाणी संकलन-व्यवस्थापन आणि विल्हेवाट, कचऱ्याचे घरगुती स्तरावर विलगीकरण, शास्त्रोक्त प्रक्रिया, शौचालये उभारणी आदींचा समावेश आहे.
या अभियानाअंतर्गत राज्य 3 सरकारकडून मुंबई शहर स्वच्छता कृती आराखडा मंजूर करण्यात आला असून त्यामध्ये मुंबईत १५ हजार सामुदायिक शौचालये, व्यवसाय-उद्योग-नोकरी निमित्ताने एक विभागातून दुसऱ्या विभागात ये-जा करणाऱ्या लोकांसाठी ४०० चल शौचालये, ४६७२ घरगुती शौचालये आणि ५०० प्रसाधनगृहे उभारण्याचे निश्चित केले आहे.