CoronaVirus News: राज्यातील मच्छिमारांना मिळणार मोठा दिलासा; लवकरच देणार डिझेल परताव्याची रक्कम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 14:14 IST2020-05-12T14:13:42+5:302020-05-12T14:14:14+5:30
डिझेल परतावा वाटपास अर्थविभागाची परवानगी मिळाली असून त्यासंबंधीचे निर्देश संबंधित विभागास देण्यात आलेले आहेत.

CoronaVirus News: राज्यातील मच्छिमारांना मिळणार मोठा दिलासा; लवकरच देणार डिझेल परताव्याची रक्कम
- मनोहर कुंभेजकर
मुंबई : महाराष्ट्रातील मच्छिमारांना 'कोरोना' आपत्तीत लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे. डिझेलवरील परताव्याच्या रक्कमेस वित्तविभागाने परवानगी दिली असून येत्या काही दिवसांत थेट लाभार्थी हस्तांतरणाद्वारे (डी.बी.टी) ही रक्कम मच्छिमारांंच्या बँक खात्यांमध्ये जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर खात्याचे मंत्री अस्लम शेख यांनी लोकमतला ही माहिती दिली.गेली अनेक महिने राज्यातील मच्छिमार सहकारी सोसायट्या या डिझेल परतावा कधी मिळणार याकडे आतूरतेने वाट बघत होते.लोकमतने मच्छिमारांची ही मागणी सातत्याने मांडली होती.
अस्लम शेख म्हणाले की, डिझेलवरील परताव्यासाठी तरतूद करण्यात आलेल्या ११० कोटींच्या निधीपैकी फेब्रुवारी २०२० अखेरपर्यंत ७८ कोटी डिझेल परताव्याचा निधी वितरीत करण्यात आला होता.पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीच्या उर्वरीत ३२ कोटींपैकी १९.३५ कोटी निधी उद्भवलेल्या 'कोरोना' आपत्तीमुळे शासनाच्या प्राधान्यक्रम देयकानुसार रोक लावल्याने दि, ३१ मार्च २०२० रोजी हा निधी परत गेला होता.
कोरोनाच्या आपत्तीकाळात मच्छिमार बांधवांना दिलासा मिळावा यासाठी हा निधी परत आणण्याच्यादृष्टीने अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यात येत होता. डिझेल परतावा वाटपास अर्थविभागाची परवानगी मिळाली असून त्यासंबंधीचे निर्देश संबंधित विभागास देण्यात आलेले आहेत. मुंबई शहर व उपनगरासाठीचा १२ कोटी ६५ लाख रुपयांचा निधीचे धनादेशही सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांकडे जमा झालेले आहेत अशी माहिती अस्लम शेख यांनी शेवटी दिली.