Join us

सरकारने ताबडतोब देशातील देवस्थानचे सोने ताब्यात घ्यावे, पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचवला मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2020 15:59 IST

देशात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मी कायम मागणी करीत होतो कि, आपली अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी जी.डी.पी.च्या किमान १०% (२१ लाख कोटी रुपये) प्रोत्साहन पॅकेज दिले पाहीजे

मुंबई - कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रात्री ८ वाजता देशवासीयांना संबोधित केले. यावेळी, आत्मनिर्भरतेसाठी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. सर्व घटकांचा विचार करून तयार करण्यात आलेल्या पॅकेजमुळे देश स्वावलंबी होईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. या पॅकेजमधल्या तरतुदींची माहिती आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन देणार आहेत. मोदींच्या आर्थिक पॅकेजच्या घोषणेनंतर काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, मी यापूर्वीच बोललो होतो, देशाला २१ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची आवश्यकता असल्याचे चव्हाण यांनी म्हटले. चव्हाण यांनी ट्विट करुन देशातील अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी एक उपायही सूचवला आहे. 

देशात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मी कायम मागणी करीत होतो कि, आपली अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी जी.डी.पी.च्या किमान १०% (२१ लाख कोटी रुपये) प्रोत्साहन पॅकेज दिले पाहीजे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. ही समाधानाची बाब आहे, आता त्याचा योग्य विनियोग होईल ही अपेक्षा, असे ट्विट चव्हाण यांनी केले होते. त्यासोबत, त्यांनी यापूर्वीच मागणी केलेल्या वृत्ताचे वर्तमानपत्रातील कात्रणही शेअर केले. त्यानंतर, चव्हाण यांनी आणखी एक ट्विट करुन केंद्र सरकारला अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी पर्याय सूचवला आहे. 

केंद्र सरकारने ताबडतोब देशातील सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये पडून असलेले सोने कर्जाने ताब्यात घ्यावे. World Gold Concil च्या अंदाजानुसार देशात १ ट्रिलियन डॉलर (किंवा ७६ लाख कोटी रुपये) इतके सोने आहे. सरकारने हे सोने १ किंवा २ टक्के व्याजाने परतीच्या बोलीवर ताब्यात घ्यावे, अशी सूचना पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन ही सूचना करताना, चव्हाण यांनी पीएमओ कार्यालयास मेन्शन केलं आहे. 

दरम्यान, अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, देशाला स्वावलंबी करण्यासाठी काल मोदींनी स्वावलंबी भारत पॅकेजची घोषणा केली. अर्थव्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाला पॅकेजमधून दिलासा मिळेल, असा विश्वास मोदींनी बोलून दाखवला. या पॅकेजची माहिती अर्थमंत्री उद्या देतील, असं मोदींनी म्हटलं होतं. आज संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन अर्थमंत्री निर्मला सीतारामन पॅकेजमधल्या तरतुदींची माहिती देणार आहेत. मोदींनी जाहीर केलेल्या पॅकेजची माहिती दोन-तीन टप्प्यांमध्ये दिली जाणार असल्याचं अर्थ मंत्रालयाचे प्रमुख सल्लागार संजीव सन्याल यांनी सांगितलं.

आणखी वाचा

आत्मनिर्भरतेचं पहिलं पाऊल... गृहमंत्री अमित शहांकडून 'स्वदेशी'च्या वापराचा आदेश जारी

... तर पुढील ५ वर्षात भारत 'आत्मनिर्भर' होईल, अमित शहांनी सांगितला मंत्र

टॅग्स :नरेंद्र मोदीपृथ्वीराज चव्हाणसोनंमंदिरकोरोना वायरस बातम्या