राज्यातील नगरपरिषदांना लस खरेदी करायला शासनाने परवानगी द्यावी, नगरपरिषदा महासंघाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2021 05:51 PM2021-07-17T17:51:16+5:302021-07-17T17:53:41+5:30

कोविड काळात राज्यातील नगराध्यक्षांनी केलेल्या कामगिरीची सविस्तर माहिती राज्यातील नगराध्यक्षांनी या ऑनलाईन सभेत दिली.

The government should allow municipal councils to purchase vaccines, the Municipal Council Federation demanded | राज्यातील नगरपरिषदांना लस खरेदी करायला शासनाने परवानगी द्यावी, नगरपरिषदा महासंघाची मागणी

राज्यातील नगरपरिषदांना लस खरेदी करायला शासनाने परवानगी द्यावी, नगरपरिषदा महासंघाची मागणी

Next

मुंबई - कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट थोपविण्यासाठी  राज्यातील नगराध्यक्षांनी गेली दीड वर्षे दिवस रात्र मेहनत घेतली. मात्र, शासनाने आता तिसरी लाट येण्यापूर्वी राज्यातील नगरपरिषदांना खाजगी रुग्णालयांच्यामाध्यमातून नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी लस खरेदी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी आज राज्यातील नगराध्यक्षांच्या ऑनलाईन सभेत नगराध्यक्षांनी केली.

नगरपरिषदा महासंघ, मुंबई आणि अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील नगराध्यक्षांच्या कार्यकारणीची ऑनलाईन सभा आज अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष व नगरपरिषदा महासंघाचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण यांनी अंधेरी येथील संस्थेच्या कार्यालयातून केली होती. प्रारंभी रणजित चव्हाण यांनी या सभेला उपस्थित असलेल्या कार्यकारणीचे स्वागत व प्रास्ताविक केले.

कोविड काळात राज्यातील नगराध्यक्षांनी केलेल्या कामगिरीची सविस्तर माहिती राज्यातील नगराध्यक्षांनी या ऑनलाईन सभेत दिली. नगरपरिषदा महासंघाचे अध्यक्ष प्रेम वसंतानी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे मानद संचालक व परिषदेचे संचालक लक्ष्मणराव लटके, नगरपरिषदा महासंघाचे सहकार्यवाह आणि खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर,नगरपरिषदा महासंघाचे माजी अध्यक्ष व अंबेजोगाई नगरपरिषदेचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत,पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष साधना भोसले,जयसिंगपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष
डॉ.नीता माने,पवनी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पूनम काटेखाये,वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष दिलीप गिरप, सातारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष माधवी कदम,औसा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख, गडचिरोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगिता पिपरे आदी नगराध्यक्षांनी चर्चेत भाग घेतला.

मार्च 2020 पासून सुरू झालेल्या कोविडमुळे
सुमारे दीड वर्षांचा कालावधी वाया गेला आहे. त्यामुळे कोरोना काळात त्यांना काम करायला अवधी मिळाला नाही. त्यामुळे राज्यातील नगराध्यक्षांना मुदतवाढ द्यावी, असा ठराव आज राज्यातील नगराध्यक्षांच्या ऑनलाईन सभेत करण्यात आला. सदर ठराव आणि या सभेचा इतिवृत्तांत शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे लक्ष्मणराव लटके यांनी सांगितले.

अंबेजोगाई नगरपरिषदेचे नगराध्यक्ष राजकिशोर मोदी म्हणाले,कोविड काळात सुमारे 1000 पिशव्या रक्तसंकलन आम्ही केले. कोविडचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जनजागृती केली आणि आरोग्य सुविधा उपलब्ध केली.

महासंघाचे सहकार्यवाह आणि खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर म्हणाले, कोविड मुळे नगरपरिषदांची आर्थिक स्थिती बिकट असून त्यांच्याकडे स्वतःचा निधी नाही. त्यामुळे जिल्हा नियोजन विकास मंडळामार्फत नगरपरिषदांना निधी उपलब्ध करून द्यावा.तसेच राज्यातील नगरपरिषदांचा नगरपरिषदा महासंघाने दौरा आयोजित करून त्यांच्या अडचणी समजावून घ्याव्यात.

माथेरान नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत म्हणाल्या की, गेली दीड वर्षे कोविड मुळे आमचा पर्यटन व्यवसाय ठप्प झाला होता,आता 26 जूनपासून पुन्हा येथे पर्यटन व्यवसाय सुरू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने आमच्या नगरपेरिषदेला मदत केली. शासनाने आम्हाला सुमारे 37 कोटी रुपये विकास कामांसाठी दिले. त्यामुळे येथील बेरोजगारांना रोजगार मिळाला. पालकमंत्री आदिती तटकरे आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कोविड काळात या भागाला भेट दिली. माथेरानला चांगली आरोग्य सुविधा मिळाली,कोविड काळात येथे कोणाचाही मृत्यू झाला नाही.तर 90 टक्के लसीकरण झाले असल्याची माहिती प्रेरणा सावंत यांनी दिली.

सातारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष माधवी कदम म्हणाल्या, पहिल्या कोविड लाटेत येथील आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने आम्ही तीन महिने दुकानांची घरपट्टी माफ केली. ज्या दुकानदारांनी लसीचे दोन डोस घेतले त्यांना दुकाने उघडण्यास परवानगी दिली. कोविड काळात येथे 350 नागरिकांचे मृत्यू झाले,त्यांच्या अत्यंसंस्काराचा खर्च सातारा नगरपरिषदेने केला.

जयसिंगपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष
डॉ. नीता माने म्हणाल्या की,शासनाने आम्हाला लसींचा जास्त साठा उपलब्ध करून घ्यावा. तसेच नगरपरिषदांमध्ये खाजगी लसीकरण मोहिम राबवल्यास 100 टक्के लसीकरण होईल.

वेंगुर्ला नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप गिरप म्हणाले, आमच्या सिधुदुर्ग जिल्ह्यात कोविड मोठ्या प्रमाणात होता. त्यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी आम्ही नगरपरिषद आणि लोकप्रतिनधी यांनी पैसे काढून आरोग्य यंत्रणा उभी केली आणि चांगले डॉक्टर आणि नर्स येथे आणले.

लक्ष्मणराव लटके यांनी सभेची सांगता केली.आणि नगरपरिषदांनी केलेल्या चांगल्या कामाचा आढावा घेतला. तर परिषदेच्या सचिव निधी लोके यांनी सभेचे चांगले आयोजन केले.
 

Web Title: The government should allow municipal councils to purchase vaccines, the Municipal Council Federation demanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.