Join us
Daily Top 2Weekly Top 5

सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 07:09 IST

पहिल्या वर्षात राज्यात पाणीपुरवठा, रस्ते व महिला कल्याणात उल्लेखनीय प्रगती; विकास वेगात; मात्र, रोजगार आणि महागाई नियंत्रणाबाबतही वाढत्या अपेक्षा; मुख्यमंत्री फडणवीस सामान्य नागरिकांच्या हितासाठी काम करत असल्याची भावना

ध्रुव रिसर्च आणि ‘लोकमत’च्या राज्यव्यापी सर्वेक्षणात ‘महायुती’ सरकारला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळाला आहे. शासनाच्या पहिल्या वर्षात तब्बल दोनतृतीयांश लोकांनी सरकारच्या कारभाराला ‘सकारात्मक’ कौल दिला आहे. विशेष म्हणजे, महिला व तरुण मतदारांचा उत्साही सहभाग हा या समर्थनामागील निर्णायक घटक ठरला आहे. सरकारच्या कामगिरीत पाणीपुरवठा, रस्ते बांधकाम आणि लोककल्याणकारी योजनांमध्ये उल्लेखनीय सुधारणा झाल्याचे मतदारांनी मान्य केले आहे. ‘लाडकी बहीण’सारख्या योजनेने महिलांमध्ये सरकारबद्दलचा विश्वास अधिक दृढ केला आहे.

६५% पेक्षा अधिक लोकांना विश्वास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘महायुती’ सरकारचे पहिले वर्ष पूर्ण करताना सुमारे ६५% पेक्षा अधिक लोकांचा ठोस विश्वास संपादन केल्याचे या सर्व्हेतून दिसून आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शासनाने प्रशासनात स्थैर्य, विकासाचा वेग आणि जनतेपर्यंत योजनांची पोहोच कायम ठेवली आहे. तथापि, सिंचन क्षेत्र हे अद्याप सरकारच्या ‘कमकुवत दुव्यां’पैकी एक असल्याचे सर्वेक्षण स्पष्ट सांगते. शेतकऱ्यांच्या अपेक्षा या क्षेत्रात केंद्रित असल्यामुळे, हे सरकारसाठी आगामी काळात महत्त्वाचे आव्हान ठरणार आहे.

पाणीपुरवठा आणि रस्त्यांमध्ये सुधारणा

राज्याच्या पहिल्या वर्षातील कामगिरीत पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेत सर्वाधिक सुधारणा झाल्याचे स्पष्ट दिसते. रस्ते आणि पायाभूत सुविधा या विभागांनी देखील ‘उत्तम कामगिरीची छाप’ उमटवली आहे. तथापि, वीजपुरवठा आणि कायदा-सुव्यवस्था यावर मतदारांची मते मिश्र स्वरूपाची राहिली.

बेरोजगारी, महागाई कमी होणे अपेक्षित

महिला कल्याणासाठी सुरू केलेल्या योजनांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे सर्वेक्षण नमूद करते. ‘लाडकी बहिण’योजनेसह अन्य सामाजिक उपक्रमांमुळे सरकारच्या प्रतिमेला नवा विश्वासाचा आधार लाभला आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, भ्रष्टाचारावर नियंत्रण आणि महागाई हे विषय जनतेच्या सर्वात मोठ्या अपेक्षांमध्ये कायम आहेत.

मराठवाडा अद्याप विकासाच्या प्रतीक्षेत

संपूर्ण राज्यात पायाभूत सुविधा आणि मराठी संस्कृतीच्या उन्नतीसाठी सकारात्मक संकेत मिळत असले तरी, मराठवाड्यातील नागरिकांना अद्याप विकासाच्या समतोल वाटपाची प्रतीक्षा आहे. या भागात विशेष लक्ष केंद्रित करण्याची गरज सर्वेक्षणाने स्पष्ट केली आहे.

सामान्यांच्या हितासाठी काम करणारे मुख्यमंत्री

नुकत्याच झालेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा जनतेचा विश्वास विविध मापदंडांवर ठळकपणे दिसून आला आहे. सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करण्यापासून ते सुधारणांसाठी आवश्यक बदल घडवून आणण्याच्या क्षमतेपर्यंत—बहुतेक सर्व निकषांवर राज्यातील मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद नोंदवला आहे. विशेषतः विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र येथून फडणवीस यांच्या नेतृत्वाला सर्वाधिक गुण मिळाले, तर इतरही सर्व विभागांतून त्यांच्या कामकाजाबद्दल ठोस समाधान व्यक्त झाले आहे. आकडेवारीनुसार मुख्यमंत्री फडणवीस यांना जनहित, प्रामाणिक प्रशासन, निर्णयक्षमता आणि युती सरकार चालविण्याच्या क्षमतेबाबत व्यापक पातळीवर पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट चित्र दिसते.

पायाभूत सुविधा, प्रकल्पांबाबत अर्ध्याहून अधिक लोक समाधानी 

राज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारने कोणती पावले उचलली, याबाबतच्या जनमतात काहीशी सकारात्मकता असली तरी आणखी बरेच काम करावे लागणार असल्याचेही आकडेवारीवरून स्पष्ट दिसून येते. गुंतवणूक, पायाभूत सुविधा यांसारख्या प्रमुख क्षेत्रांत नागरिकांनी समाधानी असल्याचे सांगितले. सामाजिक सौहार्द कायम ठेवण्यातही सरकार सकारात्मक काम करत असल्याचे दिसले. परंतु, यात आणखी काम करण्यासाठी वाव असल्याचे दिसून आले आहे. भाषा आणि संस्कृतीबद्दल मात्र लोक जास्त समाधानी आहेत.

राज्य सरकारच्या लोकप्रियतेत महिलांचा ठसा 

राज्याच्या कामगिरीबाबतच्या सर्वेक्षणात एकूण चित्र सकारात्मक आहे. विविध सामाजिक गटांमध्ये समाधानाचा वेगळा ठसा उमटताना दिसतो. महिलांनी सरकारला सर्वाधिक पसंती देत अग्रस्थानी स्थान मिळवले असून, तरुणांपासून मध्यमवयीन लोकांपर्यंत समाधानाचा कल स्थिर आहे. भौगोलिकदृष्ट्या विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र हे विभाग सरकारच्या बाजूने ठाम उभे आहेत, तर उत्तर महाराष्ट्रात प्रतिसाद तुलनेने सौम्य दिसतो. समाजघटकांमध्ये गैर- मराठा जनरल गटाचा समर्थन दर सर्वाधिक ठळक आहे. राज्य सरकारविषयी एकूण समाधानाचा सूर सकारात्मक आहे. 

लोकांना कोणत्या योजना सर्वाधिक आवडतात?

वयोगटनिहाय लाभदायक योजनांबाबत दोन स्पष्ट प्रवाह दिसतात. तरुणांमध्ये लाडकी बहिण योजना सर्वाधिक लोकप्रिय असून १८–३५ वयोगटात तिचा प्रभाव सर्वाधिक आहे. या गटात शिष्यवृत्ती योजना आणि धान्य पुरवढ्याबाबत समाधान आहे. ६०+ वयोगटात आरोग्यविषयक योजना जसे की महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत आणि वृद्धापकाळ पेन्शन या योजना अधिक लोकप्रिय आहेत. 

राज्य सरकारच्या कामगिरीत ‘दुहेरी’ चित्र, विकास आणि कल्याणाचा संतुलित ठसा

मागील वर्षांत राज्य सरकारने केलेल्या कामांची नागरिकांनी दिलेली कौल पाहिला, तर एक स्पष्ट प्रवाह दिसतो. पुरुषांना रस्ते, मेट्रो, पायाभूत सुविधा यांसारखे भविष्यवेधी विकास प्रकल्प अधिक प्रभावी वाटले, तर महिलांनी जलपुरवठा, कल्याणकारी योजना आणि महिला-केंद्रित उपक्रमांना थेट परिणाम करणारे बदल म्हणून मान्यता दिली आहे. उत्तम रस्ते जोडणी, पिण्याच्या पाण्याची सुधारित उपलब्धता, महिला-केंद्रित कल्याण योजना, आरोग्य सेवांचा विस्तार, ग्रामीण विकासातील पायाभूत सुविधांची सुधारणा यासंबंधीचे काम नागरिकांना प्रभावी वाटल्याचे दिसते.  यातून हे स्पष्ट होते की, राज्यात विकास प्रकल्पांचा वेग आणि लोककल्याणाच्या गरजांवर झालेला थेट परिणाम जनतेच्या मनावर ठसा उमटवत आहेत.

या सर्वेक्षणातून राज्य सरकारच्या कामकाजाचा प्रभाव दोन भिन्न पातळ्यांवर जाणवतो. रस्ते–मेट्रो–इन्फ्रासारखा विकास पुरुष मतदारांना भावतो, तर महिलांना जीवनमान बदलणाऱ्या कल्याण योजनांचा थेट लाभ अधिक महत्त्वाचा वाटतो.

लाडक्या बहिणींमध्ये ‘देवाभाऊ’ लोकप्रिय

मुख्यमंत्र्यांबाबत एकूण समाधानी आहात का, असे विचारले असता पुरुष आणि महिलांमध्येही फडणवीस लोकप्रिय असल्याचे दिसून आले. पण, त्यातही लाडक्या बहिणींमध्ये देवभाऊंबद्दलची माया जास्त असल्याचे दिसले आहे. बहिणींमध्ये देवाभाऊ जास्त लोकप्रिय असल्याचे सर्व्हेतील आकडेवारी सांगते. 

‘देवाभाऊ’चा तरुणांमध्ये जलवा, क्षमतेवर विश्वास

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल तरुणांमध्ये केवळ समाधानच नाही, तर ठोस विश्वासही असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट दिसून येते. सरकारच्या निर्णयक्षमतेबद्दल, कामगिरीबद्दल आणि बदल घडवून आणण्याच्या क्षमतेबद्दल तरुणांना देवाभाऊबद्दलचा विश्वास ठळकपणे उमटतो. प्रौढ व वृद्धांमध्ये तरुणांच्या तुलनेत संतुलित प्रतिसाद मिळाला असला तरी त्यातही नेतृत्वाबद्दलची सकारात्मक भावना टिकून आहे. त्यामुळे राज्यातील तरुण वर्ग फडणवीस यांच्या नेतृत्वाला एक ‘विश्वसनीय नेतृत्व’ म्हणून पाहतो, असे सर्वेक्षणात दिसले.

कोणी कसे केले सर्वेक्षण?

ध्रुव रिसर्च ही सर्वेक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरील नामवंत संस्था असून, निःपक्षपाती सर्वेक्षण करण्याचा संस्थेचा लौकिक आहे. ध्रुव रिसर्च आणि लोकमतने हे सर्वेक्षण केले आहे. २१ ते २९ नोव्हेंबर दरम्यान ९५ विधानसभा मतदारसंघात हे सर्वेक्षण करण्यात आले. विविध स्तरातील ९,८०० जणांना विविध प्रश्न विचारण्यात आले. त्यात ३५ टक्के महिला होत्या. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Government Receives Positive Public Feedback in Lokmat-Dhruv Survey

Web Summary : The Maharashtra government's first year received positive feedback, especially from women and youth, for improvements in water supply and infrastructure. While satisfaction is high, challenges remain in irrigation and unemployment, particularly in Marathwada. Chief Minister Fadnavis enjoys broad support.
टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपामहायुतीमहाराष्ट्र सरकारलाडकी बहीण योजना