Join us

महाराष्ट्र निवडणूक 2019: ही तर सदिच्छा भेट! राज्यपालांना भेटल्यानंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 18:01 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : महाराष्ट्रातील राजकीय गतिरोध शिगेला पोहोचला असतानाच आज शिवसेना नेते रामदास कदम आणि संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

मुंबई - महाराष्ट्रातील राजकीय गतिरोध शिगेला पोहोचला असतानाच आज शिवसेना नेते रामदास कदम आणि संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीमधून शिवसेना सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकते, असा अंदाज वर्तवला जात असतानाच संजय राऊत यांनी ही केवळ एक सदिच्छा भेट होती, असे सांगत राज्यातील राजकीय सस्पेन्स अधिकच वाढवला आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत म्हणाले की, ''मी आणि रामदासभाई कदम काही वेळापूर्वी राज्यपालांना भेटलो. ही एक सदिच्छा भेट होती. गेल्या काही काळापासून राज्यपालांची भेट घेण्याची इच्छा होती, पण वेळेचे गणित जुळत नव्हते. अखेर आज भेटीचे गणित जुळून आले. या भेटीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबतही चर्चा झाली. मात्र आम्ही राजभवातील शिष्टाचाराच्या मर्यादेत राहून चर्चा केली. तसेच राज्यातील सरकार स्थापनेत शिवसेना खोडा घालणार नाही, असेही आश्वासन दिले.'' ''ही सदिच्छा भेट असल्याने आम्ही राज्यपालांना उद्धव ठाकरेंनी भेट म्हणून पाठवलेली काही पुस्तके भेट म्हणून दिली. यात बाळासाहेबांच्या फटकारे या व्यंगचित्र संग्रहाचाही समावेश होता,''असेही राऊत यांनी सांगितले. तसेच बऱ्याच वर्षानंतर राज्याला अनुभवी, राजकारणाची जाण असलेला राज्यपाल लाभला असल्याचे सांगत राऊत यांनी भगतसिंह कोश्यारी यांचे कौतुक केले. 

 दरम्यान, राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा अद्याप कायम असून, त्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर फडणवीस यांनी राज्यात लवकरच सरकार स्थापन होईल, असे सांगितले होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात लवकर नवं सरकार स्थापन होईल, सत्ता स्थापनेबाबत कोण काय बोलतंय यावर बोलणार नाही असं सांगत महाराष्ट्राला नवीन सरकार देण्याची आवश्यकता आहे. लवकरच सरकार स्थापन करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पण विशेषत: या प्रतिक्रियेवेळी मुख्यमंत्र्यांनी महायुतीचा उल्लेख टाळल्याचं दिसून आलं. त्यामुळे राज्यात सरकार कुणाचे स्थापन होणार याबाबत आणखी गूढ वाढलं आहे.   

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019शिवसेनाभाजपाराजकारणसंजय राऊत