मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 20:15 IST2025-07-23T20:13:14+5:302025-07-23T20:15:58+5:30
Tansa Lake Mumbai News: मुंबईकरांना होणार मुबलक पाणीपुरवठा

मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
Tansa Lake Mumbai News: बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी तानसा तलाव आज भरुन ओसंडून वाहू आगला. आज सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी हा तलाव भरून वाहू लागल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाचे ३ दरवाजे ७ जुलैला उघडण्यात आले. तर ९ जुलैला मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागला होता. त्यापाठोपाठ आज तानसा तलावदेखील ओसंडून वाहू लागला. त्यामुळे मुंबईकरांना घरात मुबलक पाणीपुरवठा होणार आहे.
⛈️ बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी महत्त्वाचा असणारा तानसा तलाव आज सायंकाळी ५. ४० वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे.
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 23, 2025
तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता १४,५०८ कोटी लीटर (१४५, ०८० दशलक्ष लीटर) इतकी आहे.
-----
⛈️Tansa Lake, one of the lake… pic.twitter.com/pGHwYegwrk
मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. आज सकाळी ६ वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या ८६.८८ टक्के इतका जलसाठा आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात तानसा धरण असून हे सर्वात जुन्या दगडी बांधांपैकी एक मानले जाते. आज ओसंडून वाहू लागलेल्या तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता ही १४,५०८ कोटी लीटर (१४५,०८० दशलक्ष लीटर) एवढी आहे. तानसा तलाव गतवर्षी दिनांक २४ जुलै २०२४ रोजी पहाटे ४.१६ वाजता, दिनांक २६ जुलै २०२३ रोजी पहाटे ४.३५ वाजता, तर वर्ष २०२२ मध्ये दिनांक १४ जुलै रोजी रात्री ८.५० वाजता आणि सन २०२१ मध्ये दिनांक २२ जुलै रोजी पहाटे ०५.४८ वाजता ओसंडून वाहू लागला होता. तर त्या आधीच्या वर्षी म्हणजेच दिनांक २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता पूर्ण भरुन वाहू लागला होता.