Join us

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर बोनस जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 21:00 IST

BMC Bonus : यंदा मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रूपये दिवाळी बोनस दिला जाणार आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीपूर्वी बोनस म्हणजेच सानुग्रह अनुदान दिले जाते. त्यानुसार, यंदा मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रूपये दिवाळी बोनस दिला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

यंदा पालिका कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये बोनस द्यावा अशी मागणी पालिका कर्मचाऱ्यांच्या युनियन आणि कृती समितीकडून करण्यात आली होती. पालिका कर्मचारी संघटना कृती समिती आणि आयुक्त असलेले प्रशासक इकबाल सिंग चहल यांच्यात बुधवारी बैठक झाली. या बैठकीत आयुक्तांनी २० हजार रुपये बोनस देण्यासाठी सकारात्मकता दाखवली. तसेच, बोनसमध्ये वाढ करून हवी असल्यास मुख्यमंत्र्यांकडे बैठक घ्यावी, अशी सूचना आयुक्तांनी केली होती. 

त्यानुसार, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीत मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रुपये इतका बोनस देण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच, आरोग्य सेविकांना दिवाळीसाठी एक पगार आणि महापालिकेच्या शिक्षकांनाही कर्मचाऱ्यांप्रमाणेच २२ हजार ५०० रूपये बोनस देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. 

दरम्यान, या बैठकीत खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, माजी आमदार किरण पावसकर, महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, संदीप देशपांडे, शशांक राव, संतोष धुरी यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल 'मराठी'वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाकर्मचारीएकनाथ शिंदे