लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : शैक्षणिक कामकाजासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय जाहीर केला.
राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा मिळाला असून विद्यार्थी आणि पालकांवरील आर्थिक ताण आता कमी होणार आहे. कुठल्याही शैक्षणिक कामाकरीता जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेयर अथवा राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र तसेच शिक्षणाकरिता महसूल विभागाकडून जी प्रमाणपत्र लागतील त्याला कुठलेही मुद्रांक शुल्क लागणार नाही.
साधारणतः दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर हे दाखले मिळवावे लागतात. यासाठी पालकवर्ग तहसील कार्यालयात जाऊन दाखले मिळवितात. प्रत्येक दाखल्यासाठी ५०० रुपये याप्रमाणे सुमारे तीन हजार रुपये खर्ची घालतात. नव्या निर्णयामुळे पालकांचा हा आर्थिक भुर्दंड वाचणार आहे. साध्या कागदावर अर्ज लिहून सेतू कार्यालयामार्फत तहसील कार्यालयात दिल्यावर लगेच दाखले मिळतील.