Good luck! Orphan ranked 270th in JEE; missed an opportunity in IIT Mumbai by a mistake | दैव देते! अनाथाने जेईईमध्ये २७० वी रँक मिळविली; एका चुकीने आयआयटी मुंबईची संधी हुकली

दैव देते! अनाथाने जेईईमध्ये २७० वी रँक मिळविली; एका चुकीने आयआयटी मुंबईची संधी हुकली

आग्र्याचा सिद्धांत बत्रा याला ऑक्टोबरमध्ये IIT JEE (अॅडव्हान्स) २०२० मध्ये ऑल इंडिया २७० वी रँक मिळाली होती. परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या या अनाथ तरुणाने एवढे मोठे यश मिळविल्याने देशभरातून त्याची वाहवा होत होती. खरेतर त्याचे पालनपोषण त्याच्या आईने केले होते. मात्र, दोन वर्षापूर्वीच तिचे निधन झाल्याने तो अनाथ झाला होता. आयआयटी मुंबईमध्ये त्याला बीटेकची जागाही मिळाली होती. मात्र, एका छोट्या चुकीने त्याचे स्वप्न उद्ध्वस्त होताना दिसत आहे. 


झाले असे की, त्याने १८ ऑक्टोबरला सीट वाटपाचे पहिले राऊंड पूर्ण केले होते. ३१ ऑक्टोबरला तो त्याच्या रोल नंबर अपडेट झालेला पाहत होता तेव्हा त्याला एक लिंक मिळाली. त्या लिंकवर "जागा निश्चिती आणि पुढील राऊंडपासून बाहेर पडा" असे लिहिले होते. यावरून सिद्धांतला असे वाटले की, त्याला सीट मिळाली असल्याने पुढील राऊंडची गरज नसल्याने ही लिंक आली असावी. यामुळे त्याने ती लिंक क्लिक केली. 


मात्र, त्याने १० नोव्हेंबरला पाहिले तेव्हा त्याचे नाव इलेक्ट्रीकल कोर्ससाठीच्या यादीत दिसलेच नाही. या कोर्ससाठी एकूण ९३ जागा होत्या. त्याने दिलासा मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अपील केले.  यावर १९ नोव्हेंबरला सुनावणी झाली. न्यायालयाने आयआयटीला त्याच्या या अपिलावर विचार करण्यास सांगितले. मात्र, आयआयटीने नियमानुसार त्याला असे करण्याचा अधिकार नाही. सिद्धांतला पुढील वर्षी पुन्हा परिक्षा द्यावी लागेल, असे सांगत नकार दिला. 


यानंतर सिद्धांतने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तसेच जादा सीट वाढविण्याची मागणी केली आहे. सिद्धांत सध्या त्याचे आजी, आजोबा आणि मामासोबत राहत आहे. त्याला अनाथ पेन्शन मिळते. उद्या त्याच्या या मागणीवर सुनावणी होणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Good luck! Orphan ranked 270th in JEE; missed an opportunity in IIT Mumbai by a mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.