काचेची इमारत अन् धुराचा कहर; जोगेश्वरीतील बिझनेस सेंटरला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 08:37 IST2025-10-24T08:36:47+5:302025-10-24T08:37:42+5:30
साडेचार तासांच्या बचावकार्यानंतर २७ जणांची सुटका

काचेची इमारत अन् धुराचा कहर; जोगेश्वरीतील बिझनेस सेंटरला आग
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जोगेश्वरी येथे एस.व्ही. रोडवरील ब्रह्मपाडा परिसरातील जे. एन. एस. बिझनेस सेंटर या उंच इमारतीत गुरुवारी सकाळी आग लागली. काचेच्या इमारतीत आग आणि धूर कोंडल्याने ही आग नवव्या मजल्यापासून ते तेराव्या मजल्यावरील वाढत गेली.
अग्निशमन दलाने साडेचार तासांच्या बचाव कार्यानंतर २७ जणांची सुटका केली. यातील १७ जणांना धुरामुळे श्वसनाचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील आठ जणांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी पाठवण्यात आले. या आगीची तीव्रता इतकी जास्त होती की अग्निशमन दलाने ही आग लेव्हल ३ ची आग म्हणून घोषित केली.
पालिकेच्या आपत्कालीन कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी १०.५१ वाजता बिझनेस सेंटरमध्ये आग लागली. काचेच्या इमारतीत आग बाहेर पडण्यासाठी जागा नसल्याने आग तेराव्या मजल्यापर्यंत पसरली. या आगीत विविध कार्यालयांतील वायरिंग, डक्ट, फॉल्स सीलिंग, फर्निचर, कागदपत्रे, संगणक आदी साहित्य खाक झाले. तसेच इमारतीत अनेक कॉर्पोरेट ऑफिस आणि व्यापारी गाळे असून हा धूर इमारतील इलेक्ट्रिक डक्टमध्ये ही पसरत गेल्याने आगीचा प्रभाव वाढत गेल्याचे अग्निशन अधिकाऱ्यांनी सांगितले.
इमारतीत अडकलेल्यांना यामुळे श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने काही लोक काच फोडून मदतीसाठी हाका मारताना दिसले. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचल्यानंतर दुपारी २ वाजून २० मिनिटांपर्यंत अग्निशमन दलाकडून सर्व बाजूंनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले होते.
बेस्टच्या बसमार्गात बदल
बेहराम बाग मार्गावर काजू पाडा येथे इमारतीला आग लागल्यामुळे बेस्टच्या २०५, १८०, ४६४, २३४, २६१ या मार्गावरील बस रिलीफ रोड, एस व्ही. रोड मार्गे सकाळी सव्वाअकरा वाजल्यापासून वळवण्यात आले होते.
शॉर्ट सर्किटमुळे झाली दुर्घटना!
पालिकेचा अग्निशमन विभाग आणि स्थानिक पोलिस यांच्याकडून आगीच्या तपासाची कारणे शोधली जात आहेत. दरम्यान प्राथमिक अहवालानुसार इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
असे झाले बचावकार्य
इमारतीच्या चौथ्या मजल्यापासून ते तेराव्या मजल्यापर्यंत सर्व इलेक्ट्रिक डक्टमध्ये धूर कोंडल्याने अग्निशमन दलाच्या शिड्या आणि हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म लॅडरच्या मदतीने २ महिलांसह २५ जणांना सुरक्षित बाहेर काढले. यापैकी १७ जणांना तातडीने जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात हलवण्यात आले.
रुग्णालयात दाखल
फैजल काझी (४२), श्याम बिहारी सिंग (५८), मेहराज कुरेशी (१९), इक्बाल धेंकार (६१), नदीम भाटी (४३), वसीम खान (२८), मृदुला सिंग (५७), सलीम जावेद (४८), अबू भाटी (६०)
डिस्चार्ज दिलेले रुग्ण
नजराम शेख (२५), नझीर शेख (३८), ताहिरा शेख (३२), प्रणील शाह (२१), जिग्नेश शाह (५०), निशीत शाह (५१), शकील शेख (५३), मोहम्मद कैफ (२१)