Join us  

समृद्धी महामार्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्या; भाजपा आमदाराची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 9:03 AM

नागपूर येथील दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

मुंबई - मुंबई-नागपूर या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला नाव देण्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली असताना कल्याण पूर्वचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव देण्याची मागणी केली आहे. याबाबत गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिलं आहे. 

या पत्रात गणपत गायकवाड यांनी म्हटलंय की, भविष्यात महाराष्ट्राच्या विकासासाठी समृद्धी महामार्ग मुख्य मानबिंदू ठरणारा आहे. नागपूर येथील दीक्षाभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. तसेच मुंबई दादर येथील चैत्यभूमी ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समाधीस्थळ आहे. हे चैत्यस्मारक बहुजन समाज आणि बौद्ध अनुयायांचे प्रमुख श्रद्धास्थान आहे. चैत्यभूमी ते दीक्षाभूमी हे बहुजन समाजाच्या श्रद्धेचे स्थान असून या धार्मिक स्थळाला राज्यातून, देशातून हजारो लोक भेट देत असतात. त्यामुळे १० जिल्हे, ३० तालुके आणि ३५६ गावातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे असं पत्रात म्हटलं आहे. 

मागील शासनाच्या काळातील देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाचं काम संथ गतीने सुरू असले तरी त्याची नामकरणासाठी नवीन सरकारकडून गती देण्यात येत आहे. या द्रुतगती मार्गाच्या नामकरणावरून वाद होण्याची शक्यता आहे. या महामार्गाला दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव भाजपकडून ठेवण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव मोडीत काढत नवीन सरकारने मुंबई ते नागपूर या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे द्रुतगती महामार्ग नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. याची केवळ घोषणा बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

आधीच्या सरकारच्या काळातच समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. त्यावेळी फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाच्या नावावरून वाद नको, याचे नाव आधीच निश्चित झाल्याचे सांगितले होते. त्यामुळे बाळासाहेबांचे नाव या द्रुतगती मार्गाला देण्यात येईल, याची शक्यता मावळली होती. 

टॅग्स :नागपूरडॉ. बाबासाहेब आंबेडकरभाजपाउद्धव ठाकरेबाळासाहेब ठाकरेमुंबई