माजी मंत्री दिवंगत बाबा सिद्दीकी यांचे पुत्र झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना डी कंपनीकडून जीवे मारण्याची धमकी आल्याचा दावा केला आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने ईमेलद्वारे १० कोटी रुपयांची खंडणी मागितली. धमकी देणारा दर ६ तासांनी धमकीचे ईमेल पाठवत आहे, असंही एएनआयशी बोलताना झिशान सिद्दीकी यांनी सांगितले .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'झीशानलाही त्याच्या वडिलांप्रमाणे मारले जाईल, असं या मेलमध्ये म्हटले आहे. त्या बदल्यात १० कोटी रुपयांची खंडणी मागितली आहे. दर सहा तासांनी असे ईमेल पाठवले जातील असा इशाराही मेलमध्ये देण्यात आला आहे.
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
एएनआयशी बोलताना झीशान सिद्दीकी म्हणाले, "मला मेलद्वारे धमकी देण्यात आली आहे. मेलच्या शेवटी 'डी कंपनी'चे नाव लिहिले होते. त्यात १० कोटी रुपयांची खंडणी मागितले आहेत. पोलिसांनी जबाब नोंदवला आहे आणि तपास सुरू आहे. आमचे कुटुंब खूप अस्वस्थ आहे." मेलची माहिती घेतल्यानंतर पोलिसांनी झीशान सिद्दीकी यांचे जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, सायबर सेल आणि गुन्हे शाखेला तपासासाठी बोलावण्यात आले आहे.
तीन हल्लेखोरांनी हल्ला केला
बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील निर्मल नगर येथील झीशान यांच्या कार्यालयाजवळ तीन हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली होती. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली. मुंबई पोलिसांच्या तपासात या हत्येचा मास्टरमाइंड अनमोल बिश्नोई असल्याचे उघड झाले. पंजाबमध्ये अटक करण्यात आलेला आकाशदीप गिल हा कटाचा लॉजिस्टिक्स कोऑर्डिनेटर असल्याचे सांगितले जात होते, त्याने मजुराच्या मोबाईल हॉटस्पॉटचा वापर करून इतरांशी संपर्क साधला.