Join us

सरकारला इंधन दरकपातीची सुबुद्धी दे!; अशोक चव्हाण यांचे साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 03:55 IST

मुंबईत गणेशोत्सवाची धडाक्यात सुरुवात झाली असून बडे राजकीय नेते मानाच्या गणपतींना साकडे घालण्यासाठी रीघ लावत आहेत.

मुंबई : मुंबईत गणेशोत्सवाची धडाक्यात सुरुवात झाली असून बडे राजकीय नेते मानाच्या गणपतींना साकडे घालण्यासाठी रीघ लावत आहेत. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी लालबागचा राजा आणि श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही सरकारला इंधन दरकपात करण्याची सुबुद्धी देण्यासाठी लालबाग चरणी साकडे घातले.यंदाही भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांसह प्रथम लालबागचा राजा आणि नंतर सिद्धिविनायक चरणी हजेरी लावली. तर राजाच्या दर्शनासाठी दुपारी ज्येष्ठ अभिनेते रजा मुराद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आमदार भाई जगताप यांच्यासह विविध नेतेमंडळी हजर होती. अशोक चव्हाण यांनी चिंचपोकळी चिंतामणीच्या दर्शनावेळी येथील बच्चेकंपनीसोबतही संवाद साधला.राष्ट्रवादीचे नेते आमदार छगन भुजबळ यांनीही माझगाव येथील अंजीरवाडीमधील अखिल अंजीरवाडी सार्वजनिक उत्सव मंडळातील बाप्पाचे सहकुटुंब दर्शन घेतले.विरोधकांचा बाप्पा मोरया!काँग्रेसचे कृपाशंकर सिंह यांच्या घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे गेल्याने चर्चांना उधाण आले होते. याशिवाय शिवसेना आमदार आणि पक्षप्रमुखांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांच्या घरी मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावल्याने राजकीय क्षेत्रात खमंग चर्चा रंगली.

टॅग्स :इंधन दरवाढअशोक चव्हाणगणेशोत्सवभाजपाअमित शाहलालबागचा राजा