Join us

बीकेसीला बाळासाहेबांचे नाव द्या! शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 15:18 IST

या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे.  

मुंबई : ‘मुंबई उपनगराचे प्रवेशद्वार असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी)चे नाव बदलून ‘ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे संकुल करावे,’ अशी आग्रही मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे.  राज्याच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे असताना बीकेसीला बाळासाहेबांचे नावे द्यावे, अशी स्थानिकांची इच्छा होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाल्याने शिवसेनेचे वांद्रे पूर्व विभाग क्र. ५ चे विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांनी नागरिकांची मागणी उचलून धरली आहे. त्यासाठी सरमळकर यांनी सोमवारी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन एका लेखी निवेदनाद्वारे वांद्रे-कुर्ला संकुलाचे नाव बदलून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे संकुल करावे, अशी आग्रही मागणी केली. त्यावर निवेदन लवकरात लवकर मार्गी लावू असे, आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.नुकतेच कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली; तर वांद्रे-वर्सोवा सी लिंकला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. अशा तापलेल्या राजकारणात सरमळकर यांच्या मागणीने उद्धव यांच्या सेनेला ‘मातोश्री’च्या अंगणात दडपण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जात आहे.

टॅग्स :बाळासाहेब ठाकरेउद्धव ठाकरेएकनाथ शिंदे