नुसती ढकलाढकली, मेट्रो जोडणीमुळे घाटकोपर स्टेशन ठरले गर्दीचे 'हॉटस्पॉट'!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 17:11 IST2025-11-17T17:10:07+5:302025-11-17T17:11:27+5:30
Ghatkopar Metro Station: घाटकोपर स्टेशन मेट्रो १ मार्गाशी जोडले गेल्यापासून गर्दीचे हॉटस्पॉट झाले आहे.

नुसती ढकलाढकली, मेट्रो जोडणीमुळे घाटकोपर स्टेशन ठरले गर्दीचे 'हॉटस्पॉट'!
महेश कोले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: घाटकोपर स्टेशन मेट्रो १ मार्गाशी (अंधेरी-घाटकोपर) जोडले गेल्यापासून गर्दीचे हॉटस्पॉट झाले आहे. अंधेरी आणि त्या पलीकडे बोरिवली-पालघरकडे ये-जा करणारे प्रवासी रेल्वेने दादर न गाठता घाटकोपरमार्गे मेट्रोचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे घाटकोपर स्थानकात गर्दी होत असून, त्याच्या विभाजनासाठी रेल्वेने स्थानकाचे विकासकाम हाती घेतले आहे. मात्र, येथे होम प्लॅटफॉर्म उभारण्याची मागणी होत आहे.
मुंबईत मोनो, मेट्रो, एसी लोकल असे अनेक प्रयोग झाले; पण लोकलची गर्दी काही कमी होत नाही. उलटपक्षी, मेट्रोची जोडणी मिळालेल्या काही स्थानकांवर अक्षरशः गर्दी उसळत आहे. त्यावर नेमका उतारा काय, हा प्रश्न अधिक तीव्रतेने पुढे आला आहे. घाटकोपर स्टेशनवर तर सकाळ-सायंकाळी प्लॅटफॉर्म्सवर पाय ठेवायलाही जागा नसते. रुंद फूटओव्हर ब्रिज, प्लॅटफॉर्मवर १ वर नवीन एलिव्हेटेड डेक, अधिक एस्केलेटर, लिफ्ट आदी कामे घाटकोपर येथे केली जाणार असून, मार्च-एप्रिल २०२७ पर्यंत ती पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
घाटकोपरमधील गर्दी विभागण्यासाठी एमआरव्हीसीच्या माध्यमातून स्टेशनचे विकासकाम सुरू आहे. पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असले तरी दुसऱ्या टप्प्याचे काम संथ गतीने सुरू आहे. अधिकाऱ्यांचा म्हणण्यानुसार, घाटकोपर पश्चिमेला प्रवाशांची गर्दी आणि जागेची कमतरता पाहता, प्रवाशांना कमीतकमी त्रास होईल, अशा रीतीने काम सुरू आहे.
घाटकोपर पश्चिमेकडील प्लॅटफॉर्म क्रमांक १ शेजारील रस्त्यात बाधित होणाऱ्या झोपड्या हटवण्यात आल्या आहेत. त्या भागात रेल्वेला पुरेशी जागा उपलब्ध झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या जागेचा उपयोग करून येथे होम प्लॅटफॉर्म उभारावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) वॉर्ड अध्यक्ष विशाल खरंगुळे यांनी केली आहे. वाढती गर्दी, प्रवाशांची ढकलाढकली आणि प्रवासादरम्यान होणाऱ्या अपघातांचा विचार करता हा प्लॅटफॉर्म अत्यावश्यक आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या ठिकाणी प्लॅटफॉर्म बांधण्यासाठी नवीन रूळ टाकावे लागतील. संपूर्ण प्रस्तावाचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, त्यानुसार पुढील निर्णय घेतला जाईल.