जी. टी. मेडिकल काॅलेज लवकरच सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 07:25 AM2023-11-21T07:25:33+5:302023-11-21T07:25:56+5:30

विधानसभा अध्यक्षांच्या संबंधितांना सूचना

G. T. Medical college will start soon | जी. टी. मेडिकल काॅलेज लवकरच सुरू होणार

जी. टी. मेडिकल काॅलेज लवकरच सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई :  जे. जे. रुग्णालयाच्या अखत्यारीत येणाऱ्या जी. टी. रुग्णालयाचे रुपांतर वैद्यकीय महाविद्यालयात करण्याच्या प्रक्रियेला आता  वेग येण्याची शक्यता आहे. सोमवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यासंदर्भातील अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावून हे महाविद्यालय चालू करण्याच्या संदर्भात संबंधित  सूचना दिल्या. १८ नोव्हेंबर रोजी ‘दक्षिण मुंबईला मिळणार मेडिकल कॉलेज’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. 

राज्य शासनाचे दक्षिण मुंबईत सर जे. जे. रुग्णालय असून, त्याला संलग्न असे ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय आहे. या रुग्णालयांतर्गत आणखी जी. टी. कामा आणि सेंट जॉर्जेस अशी रुग्णालये आहेत. यापैकी जी. टी. रुग्णालयाचे रुपांतर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये व्हावे, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. 

जी. टी. रुग्णालयाच्या प्रांगणात कॉलेजसाठी १२ मजली इमारत उभारली होती. मात्र, सध्या पहिल्या सहा माळ्यावर बॉम्बे हायकोर्टाची प्रशासकीय कार्यालये आहेत. तसेच इतर मजल्यांवर वेगवेगळ्या विभागांची कार्यालये आहेत. या बैठकीकरिता सामान्य प्रशासन विभागाचे  सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक, जे. जे. रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठाता आणि सार्वजनिक विभागाचे प्रमुख अभियंता उपस्थित होते.

अकरा वर्षांपूर्वी अशा पद्धतीचे हे कॉलेज सुरू व्हावे, यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्याकरिता आज संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये या  महाविद्यालयाला परवानगी मिळविण्यासाठी वैद्यकीय आयोगाकडे २६ नोव्हेंबर पूर्वी अर्ज करावा लागणार आहे, त्या सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या महाविद्यालयासाठी रुग्णालयाच्या परिसरात जी इमारत उभारण्यात आली होती, त्या ठिकाणी सध्या काही शासकीय कार्यालये आहेत. ती रिकामी करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.    
    - राहुल नार्वेकर, 
    अध्यक्ष, विधानसभा

Web Title: G. T. Medical college will start soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.